ठाण्याला नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासह दोन तहसील कार्यालये
ठाण्याला नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासह दोन तहसील कार्यालये
ठाणे-:- ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील तब्बल ७६ हजार कुटुंबांना शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात यश आले असून, हे अभियान लोकाभिमुख आणि गतिमान कारभाराचे उत्तम उदाहरण ठरले आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.
त्याबरोबरच ठाण्याला नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि दोन नवीन तहसील कार्यालय देखील होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महोदयांचा जन्मदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आणि ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या पुढाकारातून ठाण्यातील गडकरी रंगायतन समोरील शिवसमर्थ विद्यालयात आज आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या कार्यक्रमात ते बोलत होते
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध शासकीय स्टॉल्सला भेट देऊन पाहणी केली. बावनकुळे यांनी ठाणे जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या नियोजनबद्ध कामाचे विशेष अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने राबविण्यात आलेल्या या सेवा उपक्रमात महसूल खात्यासह महिला व बालविकास, क्रीडा, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन आणि आदिवासी विकास अशा सर्वच विभागांनी एकत्र येत राज्यात १० लाख कुटुंबांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
यात ठाणे जिल्ह्याने अव्वल कामगिरी केली असून आमदार संजय केळकर यांनी एकट्या आपल्या मतदारसंघात ८ हजार कुटुंबांना लाभ मिळवून दिला, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी नमूद केले. बावनकुळे यांनी यावेळी ठाणे आणि पालघर परिसरासाठी शासनाने घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली.
कल्याण-अंबरनाथ भागात कृषी उत्पन्न बाजार समिती व मल्टी-मॉडेल हब उभारणीसाठी, तसेच वाढवण बंदराला जोडणाऱ्या प्रकल्पांसाठी महसूल विभागाने मोफत जमीन उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय पर्यावरण रक्षणासाठी ७३.७३ एकर जागा कांदळवनासाठी, ठाण्यात ॲग्री-युनिट व कन्व्हेन्शनल सेंटर, बीएसएनएलच्या ६० टॉवर्ससाठी जमीन, अंबरनाथ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नवोदय विद्यालय, तसेच मीरा-भार्इंदर येथे एमटीपी प्लांट व कोस्टल रोडसाठी २५ एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मीरा- भाईंदरमधील ३१८ एकर व पिंपरी येथील १३ एकर जमिनीला ‘वर्ग-२’ चा दर्जा देऊन झोपडपट्टी विकास व शासकीय जमिनींचे संरक्षण करण्यात आले असून,२६८ कर्मचाऱ्यांचा अनुकंपातत्त्वावर भरतीचा प्रश्नही निकाली काढण्यात आला आहे. नागरिकांना दिलासा देणाऱ्या कायदेशीर निर्णयांवर प्रकाश टाकताना बावनकुळे यांनी सांगितले की, बिगरशेती (NA) परवानग्यांची अट पूर्णपणे रद्द करण्यात आली असून तुकडेबंदी कायदा मागे घेण्यात आला आहे. यामुळे १५ ऑक्टोबर २०२३ पूर्वी ठाण्यात बांधण्यात आलेल्या लहान प्लॉट्सवरील सुमारे १ लाख कुटुंबांना कायदेशीर हक्क मिळणार आहेत.
१ जानेवारी २०११ पूर्वी शासकीय जागांवर असलेल्या सर्व घरांना पट्टे वाटप करून ते नियमित केले जाणार आहेत. येत्या डिसेंबरच्या अधिवेशनात राज्यातील सर्व फ्लॅटधारकांना हक्काचे ‘प्रॉपर्टी कार्ड’ देण्याचा आणि जगातील अत्याधुनिक ‘लँड टायटलिंग कायदा’ (Land Titling Act) मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय शासन घेणार आहे. यामुळे डिजिटल चिपयुक्त स्मार्ट प्रॉपर्टी कार्ड मिळेल आणि जमिनीची १५ दिवसांत मोजणी, नोंदणी व म्युटेशन ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व सुलभ होईल, असा विश्वास महसूल मंत्री बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
महसूल मंत्री बावनकुळे यांनी यावेळी या शिबिरास उपस्थित नागरिकांच्या अडचणी, तक्रारी, समस्यांची लेखी निवेदने स्वीकारली आणि त्यांच्या निवेदनांवर त्वरीत कार्यवाही करण्याचे संबंधितांना आदेश दिले.
या शिबिरात उभारण्यात आलेल्या २० हून अधिक स्टॉल्सचा आणि विविध शासकीय सेवांचा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी आपल्या भाषणातून केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant