Breaking News
काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपामध्ये प्रवेश
मुंबई – जालना येथील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये गुरुवारी प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील-दानवे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, आ. बबनराव लोणीकर, जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. नारायण कुचे, प्रदेश सरचिटणीस आ. संजय केनेकर, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
काँग्रेसच्या माजी नगरसेवकांबरोबरच माजी जि.प. ,पं.स. सदस्यांनीही मोठ्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी रविंद्र चव्हाण म्हणाले की, जमीनीवरचा कार्यकर्ता असलेले गोरंट्याल हे भाजपामध्ये प्रवेश करत आहेत याचा मनस्वी आनंद आहे. या भागातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी महायुती सरकार आणि आमची आहे. भाजपाच्या विकासाच्या राजकारणावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, ‘विकसित भारत’ आणि ‘विकसित महाराष्ट्रा’ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी गोरंट्याल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांचा विश्वास सार्थ ठरेल आणि भाजपा या सर्वांना पाठबळ देईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
भाजपामध्ये प्रवेश करताना कोणतीही अपेक्षा ठेवली नसून केंद्र आणि राज्यातील निर्णायक नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासासाठी भाजपा मध्ये प्रवेश केल्याचे गोरंट्याल यांनी स्पष्ट केले. जालन्याच्या पहिल्या महापालिका निवडणुकीत पहिला महापौर भाजपाचा होणार याची ग्वाही देतो, पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडेन असेही गोरंट्याल यांनी नमूद केले.
भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, युवा नेता अक्षय गोरंट्याल, माजी नगरसेवक महावीर ढक्का, शिक्षादेवी ढक्का, जगदीश भारतीया, विजय चौधरी, विनोद रत्नपारखे, संगीता पाजगे, आनंद वाघमारे, ग्रामीणचे सरपंच गोविंद पवार, सुनील चिरखे, सरपंच मनोहर सूळसुळे, अंबादास लोंढे, तालुका उपाध्यक्ष संतोष देव्हडे, माजी सरपंच ज्ञानेश्वर मोरे, बाळूकाका सिरसाट, किशोर कावले, पंचायत समिती माजी सदस्य समाधान शेजुळ आदींचा समावेश आहे. शरद पवार गट आणि उबाठा गटातील कार्यकर्त्यांचाही भाजपा प्रवेश झाला .
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर