वचन ठाकरेंचं! मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर
वचन ठाकरेंचं! मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे शिवशक्तीचा वचननामा जाहीर करत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. या वचननाम्यात मुंबईच्या विकास, मराठी माणसाचे हक्क, स्थानिक प्रश्न आणि प्रशासनातील पारदर्शकतेवर भर देण्यात आला आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घोषणेमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली असून प्रचाराला अधिक वेग येण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी ठाकरे बंधूंनी संयुक्तपणे ‘शब्द ठाकरेंचा’ हा वचननामा प्रसिद्ध करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत हा जाहीरनामा मांडण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करत सत्ताधारी भाजपवर आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर थेट टीका केली.
या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे, राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात आले, त्यामुळे या घडामोडीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते.
मुंबईतील शिवसेना भवनात ही संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. याच ठिकाणी वचननामा अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपविरोधात संयुक्त ताकद दाखवणे आणि मुंबईकरांसमोर आपली भूमिका स्पष्ट करणे, हा या वचननाम्याचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकशाही मूल्यांचा ऱ्हास होत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
-देशात लोकशाही संपून झुंडशाही सुरू असल्यासारखे वातावरण - उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करत केली. “देशात लोकशाही संपून झुंडशाही सुरू असल्यासारखे वातावरण आहे. आम्ही मतचोरी पकडल्यावर आमच्या उमेदवारांची पळवापळवी झाली. बिनविरोध निवडणूक हा लोकशाहीचा अपमान आहे,” असा आरोप त्यांनी केला. राहुल नार्वेकर विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमकावत असल्याचा दावा करत, त्यांच्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा आणि गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
याचवेळी त्यांनी उपहासात्मक शैलीत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “आम्ही कोस्टल रोड, मध्य वैतरणा धरण, कोरोनातील कामं केली. पण आमच्या साध्या कामांचं श्रेय घेतलं जातं. उलट मोदींनी कैलास पर्वत बांधला, गंगा स्वर्गातून आणली, मिंध्यांनी अरबी समुद्र तयार केला,” असा टोला त्यांनी लगावला. शिवस्मारक आणि रिगल चौकातील शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याच्या श्रेयावरूनही त्यांनी टीका केली.
-करातून जमा झालेल्या पैशांचा चुकीचा वापर, याचे आमच्याकडे पुरावे
महायुतीने डिपॉझिटच्या रकमेचा गैरवापर करत तब्बल ३ लाख कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. ही रक्कम आपत्कालीन परिस्थिती आणि मोठ्या प्रकल्पांसाठी राखीव होती. मात्र मुंबईकरांच्या करातून जमा झालेला पैसा चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आला असून, याचे ठोस पुरावे आमच्याकडे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांची मिश्कील टिप्पणी
दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय राऊत यांनी राज ठाकरे 20 वर्षांनी शिवसेना भवनात आल्याचा उल्लेख करताच, राज ठाकरे यांनी “मी 20 वर्षांनी सुटून आलोय असं वाटलं,” अशी मिश्कील टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.
-मराठीच महापौर का?
मराठी महापौर का नसावा, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. बडोद्यामध्ये केवळ गुजराती उमेदवार महापौर होतात, मग महाराष्ट्रात तसाच पायंडा पडला तर त्यात गैर काय, असे ते म्हणाले. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही; आम्ही आमच्या लोकांसाठी मराठी महापौर घडवू, असे राज ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.
शिवसेना-मनसेचा संयुक्त वचननामा आणि ठाकरे बंधूंचे एकत्र येणे, यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता हा वचननामा मुंबईकरांना कितपत भावतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
UBT–MNS–NCP बीएमसी निवडणूक घोषणापत्र 2026 – महत्वाच्या मुद्यांची रूपरेषा
-निवास (HOUSING)
- महापालिकेची जमीन कुठल्याही परिस्थितीत खासगी बिल्डर्सना देण्यात येणार नाही.
- मुंबईत सेवा करणाऱ्या सरकारी, महापालिका, BEST, पोलीस कर्मचारी आणि मिल मजुरांना हक्काचे घर मिळणार.
- मुंबई महानगरपालिकेची स्वतंत्र हाऊसिंग अथॉरिटी स्थापन केली जाईल.
- पुढील पाच वर्षांत 1 लाख मुंबईकरांना स्वस्त आणि अधिकारयुक्त घरे पुरवली जातील.
-सार्वजनिक आरोग्य (PUBLIC HEALTH)
- मुंबईत 5 नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जातील.
- महापालिकेतील रुग्णालयांमध्ये विनामूल्य जेनेरिक औषधे उपलब्ध असतील.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी 24x7 हेल्थ कंट्रोल रूम व होम हेल्थ सेवा सुरू केली जाईल.
- महापालिकेची स्वतःची अॅम्ब्युलन्स सेवा असेल.
- मुंबईत महापालिकेचे स्वतःचे कॅन्सर हॉस्पिटल उभारले जाईल.
- डिजिटल गव्हर्नन्स व चॅटबॉट
- महापालिकेच्या 80 महत्वाच्या सेवांना AI-आधारित चॅटबॉटद्वारे उपलब्ध करून दिले जाईल.
- मुंबईचे डिजिटल नकाशा व डिजिटल ट्विन तयार करून प्रशासन सुलभ केले जाईल.
-महिलांसाठी (FOR WOMEN)
- गृहकामगार महिलांचे नोंदणी व ‘स्वाभिमान निधी’—₹1,500 प्रतिमाह.
- महिला मच्छीमार विक्रेत्यांना नोंदणी, आर्थिक मदत व नवीन परवाने मिळतील.
- कामकाजी मुंबईकरांसाठी ‘मासाहेब किचन’—नाश्ता व जेवण फक्त ₹10 मध्ये.
- नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी उच्च दर्जाची क्रेच सुविधा.
- मुंबईत दर 2 किमी मध्ये स्वच्छ व सुव्यवस्थित महिला शौचालय.
-रोजगार (EMPLOYMENT)
- 1 लाख तरुणांना ₹25,000–₹1,00,000 स्वरोजगार सहाय्य.
- 25,000 गिग वर्कर्स व डब्बावालांसाठी ई-बाइकसाठी व्याजमुक्त कर्ज.
- पादचाऱ्यांसाठी धोरण व खुली जागा
- ‘पादचारी प्रथम’ धोरण—फुटपाथ मुक्त व दिव्यांग-सुलभ.
- महालक्ष्मी रेसकोर्स, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे जंगल यांसारख्या जागा बिल्डर्सला कधीही दिल्या जाणार नाहीत.
-शिक्षण (EDUCATION)
- महापालिकेची शाळांची जमीन बिल्डर्सना कधीही दिली जाणार नाही.
- 10 वी नंतर ड्रॉप-आउट टाळण्यासाठी शाळांमध्ये 12 वी पर्यंत ज्युनियर कॉलेज.
- सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये ‘बोलतो मराठी’ उपक्रम लागू.
-पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण
- मुंबईच्या वाढत्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी कडक पर्यावरण कार्ययोजना.
- AQI नियंत्रणासाठी मुंबई कन्स्ट्रक्शन एन्व्हायर्नमेंट मॅनेजमेंट योजना.
- जंगल, मॅंग्रोव्ह व वृक्षांचे संरक्षण; अनियंत्रित विकास रोखला जाईल.
-मुंबईचे पुनर्निर्माण (RE-INVENTING MUMBAI)
- मौलिक मुंबईच्या पुनर्रचनावर भर.
- पूर्वीच्या वॉटरफ्रंटवरील 1,800 एकरावर आंतरराष्ट्रीय व्यावसायिक व पर्यटन केंद्र.
- ऑलिम्पिक-स्तरीय स्पोर्ट्स सिटी; स्थानिकांना पुनर्वसन.
- कोस्टल रोड आणि पूर्वी वॉटरफ्रंट रोड कनेक्ट करणारे रिंग रोड ग्रिड.
- चालू प्रकल्प वेळेत पूर्ण; ठेकेदार-चालित अनावश्यक खोदकाम थांबवले जाईल.
-घरमालक कर (HOUSE TAX)
- 700 चौ.फुटपर्यंतच्या घरांवर कर माफ.
- इको-फ्रेंडली सोसायट्यांसाठी ₹1 लाख सब्सिडी.
-वीज (ELECTRICITY)
- BEST घरगुती ग्राहकांसाठी 100 युनिटपर्यंत मोफत वीज.
- पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये BEST विजेच्या सेवांचा विस्तार.
-पाळीव प्राणी (FOR PETS)
- पेट पार्क, पेट क्लिनिक, पेट अॅम्ब्युलन्स आणि पेट श्राद्धभूमी.
-तरुणांसाठी (FOR YOUTH)
- प्रत्येक वॉर्डमध्ये मिनी/मायक्रो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व आधुनिक जिम.
- जुने जिम दुरुस्त करण्यासाठी सहाय्य.
- संगीत कार्यक्रम व IPL मध्ये 18–21 वर्षे वयोगटासाठी 1 टक्के मोफत सीट
-पार्किंग (PARKING)
- महापालिका पार्किंग लॉट्समध्ये मोफत पार्किंग.
- नव्याने पुनर्विकसित इमारतींमध्ये प्रत्येक फ्लॅटसाठी अनिवार्य पार्किंग.
- परिवहन (TRANSPORT)
- तिकीट दर कमी करून 15–10–15–20 संरचना.
- BEST च्या ताफ्यात 10,000 इलेक्ट्रिक बस.
- 900 डबल-डेकर इलेक्ट्रिक बस.
- जुने BEST बस मार्ग पुन्हा सुरू करणार
- महिलांसाठी व विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा+
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade