अभय योजनेतही करभरणा न करणार्यांची मालमत्ता होणार जप्त
- by
- Dec 24, 2020
- 2666 views
नवी मुंबई ः मालमत्ताकर अभय योजना 15 डिसेंबरपासून सुरू झाली असून आठवड्याभराच्या कालावधीत प्रत्येक करवसूली अधिकार्यास देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत किती प्रमाणात वसूली झाली याबाबतच्या प्रगतीचा आढावा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला व कामाला अधिक गती देण्याचे निर्देशित केले. तसेच मोठ्या प्रमाणात थकबाकी असणार्या नागरिकांवर प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना करुन करभरणा न करणार्या थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
मालमत्ताकर भरणा करणे ही प्रत्येक मालमत्ताकर धारकाची जबाबदारी असल्याची जाणीव नागरिकांना करून द्यावी व अभय योजनेचा लाभ घेणेबाबत थकीत मालमत्ताकर धारकांशी संपर्क साधून त्यांना प्रामुख्याने ऑनलाईन करभरणा करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे सूचित करीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ऑनलाईन करभरणा प्रक्रियेची एक प्रॉपर्टी कोड टाकून प्रत्यक्ष पाहणी केली व त्यामध्ये नागरिकांना सुलभ होईल अशा महत्वाच्या सुधारणा सूचवित त्या तत्परतेने अंमलात आणाव्यात असे निर्देश दिले. मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रीत करून वसूलीची कारवाई करावी असे यावेळी सूचित करण्यात आले.
कोव्हीड प्रतिबंधासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनचा कालावधी असूनही 1 एप्रिलपासून 21 डिसेंबरपर्यंत 187 कोटी मालमत्ताकराची वसूली झाली आहे. त्यामध्ये मालमत्ताकर अभय योजना सुरू झाल्यापासून म्हणजेच 15 डिसेंबरपासून एका आठवड्यात 24 कोटी 18 लक्ष इतकी वसूली झालेली आहे. यामध्ये अधिक वाढ करण्यासाठी नियोजनबध्द काम करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. अभय योजना लागू करूनही त्या कालावधीत करभरणा न करणार्या थकबाकीदारांवर त्यानंतर बँक अकाऊंट गोठविणे, मालमत्ता जप्ती करणे अशा प्रकारची नियमानुसार पुढील कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी असणार्या नागरिकांवर प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya