Breaking News
मुंबईत पागडीधारकांना आदित्य ठाकरेंकडून पुनर्वसनाची हमी
मुंबई - मुंबईत पागडी तत्वावरील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न बरीच वर्षे प्रलंबित आहे.काही इमारती कधीही कोसळतील अशा बेतात आहेत. अशा इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या ५० पागडी धारकांनी शिवसेना उबाठाचे नेते आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray)यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. याप्रसंगी आधी पुनर्वसन केल्याशिवाय पागडीधारकांना इमारतींमधून बाहेर काढू देणार नाही,अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली.
पागडी एकता मंच संघटनेच्या माध्यमातून इमारतींच्या पुनर्वसनासाठी वर्षानुवर्षे झटत आहेत. ते सांगतात की या पागडी तत्वावरील काही इमारती १९४० साली बांधलेल्या आहेत. आता त्या डबघाईला आल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेने या इमारती अत्यंत धोकादायक ठरवल्या आहेत. येथे चांगली शौचालये नाहीत, स्वच्छ पाणी नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही. अशा अवस्थेत हे भाडेकरू या इमारतींमध्ये रहात आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी या इमारतींमध्ये राहणे अत्यंत जिकीरीचे आहे.
या इमारतींचे पुनर्वसन रखडण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास महामंडळ जबाबदार आहे,असे रहिवाशांचे म्हणणे आहे.म्हाडाने वेळीच पुनर्वसनाचे प्रकल्प मार्गी लावले नाहीत. त्यातच नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने म्हाडाचे अधिकार कमी केले आहेत. क – वर्गातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास विना अडथळा व्हावा या उद्देशाने न्यायालयाने म्हाडाकडून काही प्रमाणात हक्क काढून घेतले आहेत. त्यामुळे आमच्या अ – वर्ग इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरी राहिला आहे,असे रहिवाशांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांनी या प्रतिनिधींना आपल्या पक्षाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . आधी पूनर्वसन नंतर इमारती रिकाम्या करू अशा भूमिकेवर ठाम रहा,शिवसेना सर्वतोपरी तुम्हाला मदत करील ,अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar