Breaking News
23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प
नवी दिल्ली, -: देशात १८ व्या लोकसभेच्या स्थापनेनंतर आता मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सज्ज आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या २३ जुलै रोजी संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 22 जुलैपासून अधिवेशनाला सुरुवात होणार असून हे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालेल.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी X वर लिहिले आहे की, माननीय राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सदनांचे अधिवेशन 22 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीमध्ये बोलावण्यासाठी मंजुरी दिली आहे. 2024-2025 सालचा केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलै 2024 रोजी सादर करण्यात येईल.”
2024 हे निवडणुकीचं वर्ष असल्याने या वर्षी दोनदा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. आता नवे सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला जाणार आहे. सलग सात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत. ते मोरारजी देसाईं यांना मागे टाकतील. देसाई यांनी सलग सहा अर्थसंकल्प सादर केले होते.
संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाले होते की, अर्थसंकल्पात अनेक मोठे सामाजिक आणि आर्थिक निर्णय घेतले जातील. ते म्हणाले होते, “अर्थसंकल्पात मोठे आर्थिक आणि सामाजिक निर्णय घेतले जातील आणि अनेक ऐतिहासिक पावले उचलली जातील. देशातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सुधारणांचा वेग वाढवला जाईल.
भाजप संचालित NDA साठी हे अधिवेशन कसोटीचे ठरणार आहे. खासदारांच्या शपथविधीसाठी आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनामध्ये विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला होता. या अधिवेशनात नीट-युजी परीक्षेसह इतर विषयांवरून विरोधकांनी सरकारला घेरले होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE