Breaking News
राज ठाकरे आल्यानं कित्येक पटीनं आनंद- उद्धव ठाकरे
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांचा 65 वा वाढदिवस असल्यानं शनिवारी रात्रीपासून मातोश्रीवर शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी मातोश्रीवर होताना पाहायला मिळत आहे. तर उद्धव ठाकरेंना अनेक राजकीय नेत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशातच मनसेप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांच्या भेटीनंतर या दोन बंधूंची युती होणार का? यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.
राजच्या भेटीनं आनंद कित्येक पटीनं गुणीत झाला : राज ठाकरेंच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी या भेटीवर आनंद व्यक्त केला आहे. "आज राज ठाकरेंनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, त्यामुळं आनंद झाला. राजच्या भेटीनं आनंद द्विगुणीत झाला. नुसता द्विगुणीत नाही. कित्येक पटीनं गुणीत झाला आहे. त्यामुळं नक्कीच पुढचा सर्व काळ चांगला होईल. ज्या घरात, खोलीत आम्ही लहानाचे मोठे झालो... बाळासाहेबांनी एकत्र वाढवलं... त्या खोलीत भेटलो, हा खूप आनंद झाला आहे, " अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे. तर उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राज ठाकरेंनीही सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. "माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या..." असं पोस्टमध्ये राज ठाकरेंनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे" असा उल्लेख राज ठाकरेंनी केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant