अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार
मुंबई - महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी तसेच ओला, उबर आणि ई-बाईक टॅक्सी सेवांमधील अमराठी व्यावसायिक वाहनचालकांनी प्रवाशांशी मराठीतून संवाद साधणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ, साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित केली.
या बैठकीत मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्यिकांनी अमराठी चालकांना जुजबी व्यावहारिक मराठी शिकवण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. राज्यातील अमराठी परप्रांतीय वाहनचालकांकडून प्रवाशांशी मराठीत संवाद साधला जात नसल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर हा विषय गांभीर्याने घेत राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे.
अमराठी वाहनचालकांवर अनावश्यक दडपण न आणता, खेळीमेळीच्या वातावरणात त्यांना जुजबी व्यावहारिक मराठी शिकविण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आपल्या ७२ शाखांमधून शिकवणी वर्ग सुरू करण्याची तयारी दर्शवित आहे. तसेच, मुंबई मराठी साहित्य संघाने आपल्या हजारो स्वयंसेवी शिक्षकांच्या माध्यमातून ऑनलाईन मराठी भाषा प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रशिक्षणासाठी चालकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधत संपूर्ण राज्यभर रिक्षा व टॅक्सी चालकांच्या परवान्यांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमे दरम्यान इतर नियमांसोबतच चालकांना मराठी भाषेचे व्यवहारज्ञान आहे की नाही, याचीही पडताळणी केली जाईल. या संदर्भात काही अमराठी चालकांच्या मनात निर्माण झालेली अनावश्यक भीती दूर करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी भाषेला नुकताच ‘अभिजात भाषा’ दर्जा मिळाल्यामुळे या उपक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हा निर्णय केवळ प्रशासकीय न राहता अमराठी वाहनचालकांमध्ये मराठी भाषेबद्दल आत्मीयता निर्माण करणारा ठरावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
या उपक्रमांतर्गत अमराठी वाहनचालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्षा उज्ज्वला मेहेंदळे तसेच ज्येष्ठ साहित्यिक महेश केळुसकर, संतोष राणे, अशोक बागवे, बाळ कांदळकर, सुनील तांबे, शिवाजी गावडे, सतीश सोळांकुरकर, अरुण म्हात्रे, एकनाथ आव्हाड, प्रसाद कुलकर्णी, प्राचार्य अशोक चिटणीस, ज्येष्ठ साहित्यिका अनुपमा उजगरे, दीपा ठाणेकर आणि मनीषा राजपूत आदींच्या मार्गदर्शनामुळे या मोहिमेला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली. अमराठी वाहनचालक आणि प्रवाशांमधील संवाद सुलभ करण्यासोबतच मराठी भाषेचा सन्मान राखण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant