नेहरू सेंटरच्या आर्ट गॅलरीत अवतरला वाईतील कृष्णा काठ अन् डोंगररांगा!
नेहरू सेंटरच्या आर्ट गॅलरीत अवतरला वाईतील कृष्णा काठ अन् डोंगररांगा!
धुक्यात हरवलेली वाई… कृष्णा नदीचा काठ… महागणपतीच्या मंदिरावर पहुडलेलं सकाळचं कोवळं ऊन… पाचगणीच्या डोंगररांगामध्ये विसावलेली सायंकाळ… पुरातन मंदिरांभोवतीची निरव शांतता… आणि दूरदूरपर्यंत पसरलेलं मन मोहवून टाकणारं निसर्गचित्र…! या विविधरंगी अनुभवांसाठी निमित्त ठरले ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील कला अकादमीच्या आर्टिस्ट कॅम्पमधील निवडक चित्रांच्या प्रदर्शनाचे… ! हे प्रदर्शन दक्षिण मुंबईतील वरळीतल्या नेहरू सेंटरच्या आर्ट गॅलरीत महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे आयोजित करण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील कला अकादमीतील कला शिक्षकांची चार दिवसीय निसर्गचित्रण कार्यशाळा डिसेंबर २०२५ मध्ये वाई (जि. सातारा) येथे पार पडली. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या शिक्षकांनी वाई, पाचगणी, मेणवली, धोम धरण, नृसिंह मंदिर, तीर्थक्षेत्र संगम माहुली या ठिकाणचे निसर्गचित्र साकारले. या कार्यशाळेतील निवडक चित्रकृतींचे प्रदर्शन वरळीतील नेहरू सेंटर येथील आर्ट गॅलरीत भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती राजेश्री शिरवडकर यांच्या हस्ते आज (दिनांक १ एप्रिल २०२६) पार पडले.
उपशिक्षणाधिकारी श्री. मुख्तार शहा, श्री. निसार खान, श्री. विनोद कदम, अधीक्षक श्री. लक्ष्मण गोसावी, कला अकादमीचे प्राचार्य श्री. दिनकर पवार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कला अकादमीचे निदेशक व शिक्षक आदी याप्रसंगी उपस्थित होते. दिनांक १ एप्रिल ते दिनांक ६ एप्रिल २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे चित्रप्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.
चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती राजेश्री शिरवडकर म्हणाल्या, महानगरपालिकेच्या कला शिक्षकांनी वाई तालुक्यातील निसर्ग जणू रंगांच्या रुपात जिवंत केला आहे. आर्टिस्ट कॅम्पच्या माध्यमातून वाई, पाचगणीतील अनेक परिसर, मंदिरे आपल्या कुंचल्यातून साकारुन प्रत्येक चित्रकाराने एक वेगळीच दुनिया उभी केली आहे. हा अतिशय आनंददायी उपक्रम आहे. शिक्षकांमधील कलागुलांना यातून वाव मिळतो. निसर्गाशी एकरुप होणारे असे हे प्रदर्शन असल्याचेही श्रीमती शिरवडकर म्हणाल्या.
कला अकादमीचे प्राचार्य श्री. दिनकर पवार यांनी आर्टिस्ट कॅम्पची संकल्पना यावेळी स्पष्ट केली. चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी संपूर्ण प्रदर्शनाला भेट दिली. श्रीमती शिरवडकर यांना कलेविषयी आवड असल्याने त्यांनी प्रत्येक चित्रातील बारकावे टिपले. प्रत्येक कलाशिक्षकांकडून त्यांनी साकारलेल्या चित्राविषयी माहिती घेतली. या प्रदर्शनात ३५ चित्रकारांच्या ७० निवडक चित्रांचा समावेश आहे. तरी हे प्रदर्शन अधिकाधिक मुंबईकरांनी अनुभवावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade