लाठी–काठी स्पर्धांतून किशोरींमध्ये आत्मविश्वास; ठाण्यात भव्य अंतिम फेरी उत्साहात संपन्न
लाठी–काठी स्पर्धांतून किशोरींमध्ये आत्मविश्वास; ठाण्यात भव्य अंतिम फेरी उत्साहात संपन्न
ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : “लाठी–काठी स्पर्धांच्या माध्यमातून सेवा सहयोगचा किशोरी विकास प्रकल्प ग्रामीण व आदिवासी भागातील मुलींमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि धैर्य निर्माण करत आहे,” असे गौरवोद्गार प्रमुख पाहुणे व MAFFFL या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पाटणकर यांनी काढले. पत्रकार योगिता साळवी या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सेवा सहयोग फाउंडेशन व महानगर गॅस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे लाठी–काठी व शिवचरित्र अभिव्यक्ती स्पर्धेची भव्य अंतिम फेरी मोठ्या उत्साहात पार पडली.
या वर्षी युनेस्कोकडून १२ किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शिवचरित्र अभिव्यक्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. किशोरी विकास प्रकल्पांतर्गत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, माणगाव, महाड, श्रीवर्धन, कर्जत व खोपोली परिसरातील ११४ किशोरी वर्गांपैकी निवडक १० वर्गांतील मुलींनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
लाठी–काठी स्पर्धेत मुलींचा जोश, उत्साह आणि शिस्त पाहण्याजोगी होती. शिवाजी महाराजांवरील विविध गाण्यांच्या तालावर मुलींनी लाठी–काठीचे प्रभावी आणि आकर्षक प्रयोग सादर केले. शिवचरित्र अभिव्यक्ती स्पर्धेत महाराजांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग उत्साहात सादर करण्यात आले. शिवजन्म, रायगड व सिंधुदुर्ग यांची जन्मकथा, गड आला पण सिंह गेला, हिरकणी यांसारखे नाट्यप्रसंग प्रेक्षकांची मने जिंकून गेले.
लाठी–काठी स्पर्धेसाठी ठाण्याचे बाळा साठे व दापोलीचे सुरेंद्र शिंदे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर शिवचरित्र अभिव्यक्ती स्पर्धेसाठी स्मिता भोसले–धुमाळ व प्रा. भारती जोशी यांनी परीक्षकांची भूमिका निभावली. लाठी–काठी स्पर्धेत प्रथम क्रमांक पालघर विभागाने पटकावला. द्वितीय क्रमांक कर्जत, तर तृतीय क्रमांक खोपोली विभागाला मिळाला. महाड विभागाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
शिवचरित्र अभिव्यक्ती स्पर्धेत ठाण्यातील झवेरी–ठाणावाला विशेष शाळेच्या मुलांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय पारितोषिक श्रीवर्धन, तर तृतीय पारितोषिक महाड विभागाला मिळाले. उत्तेजनार्थ बक्षीस नवी मुंबई व कर्जत विभागांना देण्यात आले. या उपक्रमामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास, शिस्त, संघभावना आणि सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade