अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस.टी. बसमध्ये मोफत प्रवास
अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस.टी. बसमध्ये मोफत प्रवास
मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती देखील लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस.टी.च्या सर्व बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे. एसटी बस सीट आरक्षित करण्यासाठी १५ ऑगस्टपासून ऑनलाइन आरक्षणाची सुविधा देण्यात येईल तसेच आठ हजार की.मी. पर्यंत प्रवासाची मर्यादाही काढणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
विधान भवनात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आधीस्वीकृतीधारक पत्रकारांच्या एसटी बस प्रवासाच्या सवलतींच्या मुद्यावर गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दीपक भातुसे, खजिनदार विनोद यादव, कार्यकारिणीचे सदस्य प्रशांत बारसिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सद्यस्थितीत अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना साध्या, निमआराम व शिवशाही (आसनी/शयनयान) बसप्रकारामध्ये १००% प्रवास भाड्याची सवलत मिळते. मात्र, या सवलतीवर आठ हजार किमीची मर्यादा आहे. ही मर्यादा रद्द करण्याची मागणी वारंवार होत असून, ती मंजूर करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच पत्रकारांना एसटीच्या सर्व बसेस मधून मोफत प्रवास करण्याची सवलत अनुज्ञेय करावी अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत ९ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत केली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिले असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
या मागणीबाबत सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांना एसटी प्रवासासाठी सद्या ऑनलाइन आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध नाही. येत्या १५ ऑगस्टपासून ऑनलाइन सीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना पुढील महिन्यापासून घरबसल्या एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी सीट आरक्षित करता येईल.
या निर्णयांमुळे पत्रकारांना काम करताना अधिक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगत मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांचे आभार मानले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant