महिलांच्या स्वप्नांना मिळणार हक्काचे व्यासपीठ; मनसेच्या वतीने भायखळ्यात भव्य दिवाळी बाजारपेठेचे आयोजन!
ना स्टॉलचे भाडे, ना आर्थिक ओझे; महिला उद्योजिकांना स्वयंपूर्णतेची संधी देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुढाकार
मुंबई : दिवाळीच्या सणानिमित्त महिला उद्योजिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह त्यांच्या व्यवसायाला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भायखळा विधानसभा क्षेत्रात भव्य विभागीय महिला दिवाळी बाजारपेठेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या बाजारपेठेत सहभागी होणाऱ्या महिलांना विनामूल्य स्टॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सोमवार, २ नोव्हेंबर ते शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या बाजारपेठेच्या माध्यमातून महिला उद्योजिकांना आपली उत्पादने नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची आणि व्यवसायवृद्धीची संधी मिळणार आहे. महिलांनी तयार केलेल्या वस्तू, दिवाळी साहित्य तसेच विविध उत्पादनांना ग्राहक मिळवून देण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या बाजारपेठेचे आयोजन तीन ठिकाणी करण्यात आले आहे. यामध्ये चिंचपोकळी स्टेशन (पश्चिम), वारसा हॉटेल, काळाचौकी नाका आणि म्हाडा कॉलनी, फेरबंदर या ठिकाणांचा समावेश आहे.
या बाजारपेठेचे उद्घाटन मनसे नेते मा. बाळा नांदगावकर साहेब आणि मनसे सरचिटणीस रिटा ताई गुप्ता यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नगरसेविका मा. सुप्रिया दळवी आणि सरचिटणीस मा. संजय नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
भायखळा विधानसभा क्षेत्राचे विभाग अध्यक्ष अमोल अर्जुन रोगये यांच्या पुढाकारातून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भायखळा विधानसभा यांच्या आयोजनातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
महिलांना केवळ आर्थिक मदत नव्हे, तर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी संधी आणि प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. याच विचारातून विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांच्या कष्टाला बाजारपेठ मिळाली, तर त्यातून त्यांचा आत्मविश्वास आणि आर्थिक स्वावलंबन अधिक मजबूत होऊ शकते.
दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी या बाजारपेठेला भेट देऊन महिला उद्योजिकांकडून वस्तूंची खरेदी करावी आणि त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
महिला सक्षमीकरणाचा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा हा उपक्रम भायखळा विधानसभा क्षेत्रातील महिला उद्योजिकांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant