नृत्यगुरु शुभदा वराडकर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित
नृत्यगुरु शुभदा वराडकर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित
मुंबई- : ओडिसी नृत्याच्या समर्पित कलासाधिका गुरु शुभदा वराडकर यांच्या कलासाधनेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीमार्फत दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य व पारंपारिक कलांच्या विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. वराडकर यांना २०२४-२५ या वर्षासाठी नृत्य क्षेत्रातील ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ भारताच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते १३ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.
भारतातील ओडिसी नृत्याच्या अग्रगण्य कलाकार, नृत्यदिग्दर्शिका, संशोधक, लेखिका आणि गुरु म्हणून शुभदा वराडकर सुपरिचित आहेत. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरेच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी अविरत साधना केली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कलासाधनेचा गौरव संगीत नाटक अकादमी पुरस्कार २०२४ या प्रतिष्ठित सन्मानाने करण्यात आला आहे. त्यांनी प्रारंभी गुरु मणी यांच्याकडून भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आणि पुढे पद्मविभूषण गुरु केळुचरण महापात्र यांच्या मार्गदर्शनाखाली ओडिसी नृत्याची सखोल साधना केली.
त्यांच्या नृत्यात तांत्रिक कौशल्य, लयबद्ध सौंदर्य, भावपूर्ण अभिनय आणि आध्यात्मिक अनुभूती यांचा सुरेख संगम आढळतो. खजुराहो नृत्य महोत्सव, ताज महोत्सव, कालिदास महोत्सव, नेहरू सेंटर, लंडन, फेस्टिव्हल ऑफ इंडिया, घाना तसेच मुंबईतील एनसीपीए यांसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ‘मृत्युंजय’, ‘कानुप्रिया’, ‘चित्रांगदा’, ‘मयूरपंख’, ‘ऋतुसंहारम्’ आणि ‘प्रकृती नर्तन’ यांसारख्या त्यांच्या नृत्यनिर्मितींमधून शास्त्रीय नृत्य, साहित्य, संगीत, तत्त्वज्ञान आणि समकालीन विचारांचा सुंदर मिलाफ दिसून येतो. त्या एक अभ्यासू लेखिका व संशोधक असून ‘मयूरपंख’, ‘द सेलेस्टियल प्लूम’ आणि ‘ओड्र मागधी ते ओडिसी – एक प्रवास’ यांसारख्या साहित्यकृती त्यांच्या नावावर आहेत.
संस्कृता फाउंडेशनच्या माध्यमातून त्या कला, संस्कृती, शिक्षण आणि समाजोपयोगी कार्याला चालना देत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देत त्या ओडिसीची परंपरा पुढील पिढीकडे समर्थपणे सुपूर्द करीत आहेत. नृत्य ही केवळ त्यांची कला नसून ती त्यांची साधना, संस्कृतीची उपासना आणि आयुष्यभराची अध्यात्मिक यात्रा आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर