मोस्का बंधूंच्या वादळी फलंदाजीवर इटलीचा दणदणीत विजय; नेपाळचा १० गडी राखून पराभव
मोस्का बंधूंच्या वादळी फलंदाजीवर इटलीचा दणदणीत विजय; नेपाळचा १० गडी राखून पराभव
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील १७व्या सामन्यात गट ‘क’ मध्ये इटलीने नेपाळचा १० गडी राखून दणदणीत पराभव करत स्पर्धेतील आपली आगेकूच भक्कम केली. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम गोलंदाजी करत इटलीच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध आणि अचूक मारा करत नेपाळचा डाव अवघ्या १९.३ षटकांत १२३ धावांत गुंडाळला. त्यानंतर सलामीवीर जस्टिन मोस्का आणि अँथनी मोस्का यांनी संयमी व आक्रमक फलंदाजीचा सुरेख संगम साधत सामना पूर्णपणे एकतर्फी केला.
प्रथम फलंदाजी करताना नेपाळकडून आरिफ शेखने सर्वाधिक २७ धावा केल्या. कर्णधार रोहित पौडेलने २३, आसिफ शेखने २०, तर दीपेंद्रसिंग एरीने १७ धावांची खेळी केली. केसी करणने अखेरच्या षटकांत नाबाद १८ धावा जोडत झुंज दिली; मात्र इतर फलंदाज अपेक्षित योगदान देऊ शकले नाहीत. इटलीकडून क्रिशन कलुगमागेने भेदक गोलंदाजी करत ४ षटकांत केवळ १८ धावा देत ३ महत्त्वपूर्ण बळी घेतले. बेन मॅनेटीने २, तर अली हसन, जेजे स्मट्स आणि जसप्रीत सिंग यांनी प्रत्येकी १ बळी घेत नेपाळच्या फलंदाजीला खीळ घातली. उत्कृष्ट कामगिरीसाठी क्रिशन कलुगमागेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
१२४ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना इटलीच्या सलामीवीरांनी नेपाळच्या गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. जस्टिन मोस्काने ४४ चेंडूंमध्ये नाबाद ६० धावांची संयमी आणि परिपक्व खेळी साकारली, तर अँथनी मोस्काने ३२ चेंडूंमध्ये नाबाद ६२ धावांची वादळी खेळी करत सामना अवघ्या १२.४ षटकांत संपवला. दोघांनी मिळून नाबाद १२४ धावांची भागीदारी रचत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.
या दमदार विजयासह इटलीने गट ‘क’ मधील आपली स्थिती अधिक मजबूत केली असून, उपांत्य फेरीकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने हा विजय निर्णायक ठरू शकतो. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे इटलीचा आत्मविश्वास उंचावला असून, पुढील सामन्यांतही त्यांच्या धडाकेबाज खेळींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant