प्रेस क्लबचे ‘ समर ‘ गुरवीर जिंकला, सुरेन्द्र गांगण नवे अध्यक्ष
प्रेस क्लबचे ‘ समर ‘ गुरवीर जिंकला, सुरेन्द्र गांगण नवे अध्यक्ष
मुंबई -: अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई प्रेस क्लबच्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी सुरेंद्र गांगण यांनी दिग्गज उमेदवार राजीव खांडेकर यांचा प्रचंड मताधिक्काने पराभव करीत विजय प्राप्त केला. त्यासोबतच त्यांच्या पॅनेलचे सर्वच्या सर्व १६ उमेदवारही मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, यामुळे प्रतिष्ठेचे झालेले हे
‘ समर ‘अखेर गुरुविरने जिंकले असे आता म्हणता येईल.
काल झालेल्या प्रेस क्लबच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच ‘ सेव्ह प्रेस क्लब अलायन्स ‘ या पॅनलने जोरदार मुसंडी मारलेली पाहायला मिळाली. आधी त्यांचे अंतर्गत हिशेब तपासणीस रेड्डी बहुमताने निवडून आले, त्यानंतर सदस्य छाननी समिती वरती देखील पाचही सदस्य याच पॅनलचे निवडून आलेले पाहायला मिळाले. हाच ट्रेंड नंतर कायम राखत संपूर्ण कार्यकारणीसाठी झालेल्या मतदानामध्ये बहुतांश सर्व उमेदवारांनी 500 हून अधिक मते घेत या निवडणुकीमध्ये जोरदार मुसंडी मारली. प्रेस क्लबच्या इतिहासामध्ये बहुदा पहिल्यांदाच 862 इतक्या विक्रमी सदस्यांनी मतदान केलेले पाहायला मिळाले.
ही निवडणूक जाहीर झाल्यापासून अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. या क्लबचे माजी अध्यक्ष असणारे गुरुविर सिंग यांना प्रेसक्लबमधून निलंबित केल्यानंतर त्यांनी इथे पुन्हा पकड मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातूनच ‘ सेव्ह प्रेस क्लब अलायन्स ‘ पॅनल जन्माला आले. त्यांनी विद्यमान अध्यक्ष असणाऱ्या समर खडस यांच्या ‘ पीडीए ‘ पॅनलला जोरदार आव्हान दिले. प्रेस क्लब आपणा सर्वांचाच , कोणा एका व्यक्तीचा नाही असा नारा देत त्यांनी प्रेस क्लबच्या निवडणुकीमध्ये जान फुंकलेली पहायला मिळाली होती.
समर खडस यांनी स्वतः निवडणुकीमध्ये न उतरता राजीव खांडेकर यांना अध्यक्षपदासाठी निवडणुकीत उतरवून आपल्या विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र समोर सुरेंद्र गांगण या मनमिळावू, प्रामाणिक आणि रस्त्यावर उतरून पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराला आव्हान देणे खांडेकर यांना शेवटपर्यंत जमलेच नाही. आपल्याला आयत्यावेळी घोड्यावर बसवल्याची भावना त्यांनी एका कार्यक्रमात बोलून देखील दाखवली होती. वास्तविक पाहता खांडेकर यांनी या निवडणुकीतच पडायला नको होते, ते कायम दिल्लीत असतात त्यामुळे त्यांनी मुंबईतील पत्रकारांच्या लढाईत सामील व्हायला नको होते अशीच प्रेस क्लब मधील बहुतांश सदस्यांची भावना होती.
प्रेस क्लबच्या यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभांमध्ये जेमतेम 40 ते 50 इतकी उपस्थिती असायची मात्र काल झालेल्या सर्वसाधारण सभेत तब्बल 240 सदस्य उपस्थित होते. यावरूनच प्रेस क्लब मध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होईल अशी चिन्हे दिसू लागली होती. काल दुपारी बारा वाजता मतदान सुरू झाल्यानंतर सदस्यांची रांग टीव्ही जे ए च्या कार्यालयापर्यंत लांब गेलेली पाहायला मिळाली. ती सायंकाळी सात वाजेपर्यंत कमी झालेली नव्हती. यावरूनच ही निवडणूक सदस्यांनीच हातात घेतली असून समर खडस यांच्या एकाधिकारशाहीला धक्का देण्यासाठीच ही भावना असल्याचे मानले जात आहे.
राजीव खांडेकर हे लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, एबीपी माझा अशा महत्त्वाच्या प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प पदांवर असून देखील त्यांचे अनुयायी असणाऱ्या अनेक पत्रकार मित्रांनी त्यांच्याच विरोधामध्ये भूमिका घेत,
‘ सेव्ह प्रेस क्लब अलायन्सला ‘ खुलेआम पाठिंबा दिला होता. यावरूनच खांडेकर यांचा पराभव समोर दिसू लागला होता. काल निवडणूक निकाल जाहीर होताच खांडेकर यांचा मानहानीकारक पराभव झाल्याने त्यांच्या विद्यमान पदाला काहीशी अप्रतिष्ठा प्राप्त झाल्याचे मानले जात आहे. समर खडस यांच्या बाजूने प्रेस क्लब मधील जेमतेम 40% मतदार उभे राहिल्याचे पाहायला मिळाले. खांडेकर यांना सर्वात कमी मते मिळाल्याचे पाहायला मिळाले, याउलट पराभूत झालेल्या बहुतांश उमेदवारांना खांडेकर यांच्यापेक्षा कितीतरी अधिक मते पडल्याचे दिसून आले.
आता सुरेंद्र गांगण यांच्यासमोर अपेक्षांचे मोठे आव्हान उभे असून विविध गटातटांना एकत्रित करत त्यांनी ही निवडणूक लढवली आणि जिंकली देखील, मात्र सदस्यांची छाननी करणे, त्यात मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी ओढवून घेणे आणि विविध गटातटांना सोबत ठेवून प्रेस क्लबचे तारू सुखरूपपणे हाकणे यासारखी काही मोठी आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. गांगण हे मितभाषी आणि हसतमुख असल्यामुळे हे आव्हान ते सहज पेलू शकतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade