कुसुमाग्रजांना शब्दांजली : चोविसावे कविसंमेलन भावनांच्या सुरेल लयींत संपन्न
कुसुमाग्रजांना शब्दांजली : चोविसावे कविसंमेलन भावनांच्या सुरेल लयींत संपन्न
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी साहित्य व कला सेवा यांच्या वतीने आयोजित चोविसावे कविसंमेलन रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतील हिंदू कॉलनी, दादर (पूर्व) येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या राजा शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण, साहित्यनिष्ठ आणि भावनाप्रधान वातावरणात संपन्न झाले. मराठी कवितेचा समृद्ध वारसा जपत कवी–रसिक संवाद अधिक व्यापक व्हावा, या उद्देशाने आयोजित या संमेलनात शब्द, भावना आणि विचार यांचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला.
सायंकाळी ४:३० वाजता सुरू झालेल्या या संमेलनात मुक्त विषयांवरील काव्यसादरीकरणासोबतच कुसुमाग्रजांना अभिवादन करणारे विशेष सत्र विशेष लक्षवेधी ठरले. वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या सामाजिक जाणीवांनी परिपूर्ण आणि मानवी मूल्यांना दिशा देणाऱ्या कवितांचे प्रभावी सादरीकरण कवींनी केले. कुसुमाग्रजांच्या शब्दांतून व्यक्त होणारी संघर्षाची धार, माणुसकीची आर्त हाक आणि वैचारिक स्पष्टता यामुळे संपूर्ण सभागृह भारावून गेले.
या कविसंमेलनात अदिती अजित नैराळे, अशोक दशरथ भवार, अशोक सहदेव सुकाळे, कल्पना उबाळे, कल्पना दिलीप मापूसकर, कृपा राकेश म्हात्रे, धनंजय पांडुरंग पाटील, महेश दत्ताराम दळवी, मोहित जनार्दन तांडेल, राहुल इंगोले, वनिता सचिन साळुंखे, विक्रांत मारुती लाळे, वैभवी विनीत गावडे, संतोष धर्मराज मोहिते आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर आदी कवींनी आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली. तसेच चंद्रकांत दढेकर, नमिता नितीन आफळे आणि प्रा. स्नेहा केसरकर यांनी आशयपूर्ण व भावनाप्रधान अभिवाचन सादर करून उपस्थितांची विशेष दाद मिळवली.
आस्वादक म्हणून राकेश म्हात्रे, अर्चना देशपांडे जोशी, वनिता अशोक भवार, आदेश अशोक भवार आणि मनिषा रामचंद्र कदम यांनी सूक्ष्म, संवेदनशील आणि अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया देत कवितांचे सौंदर्य उलगडून दाखवले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नमिता नितीन आफळे यांनी संयत, रसाळ आणि प्रभावी शैलीत केले. तर सुंदर छायाचित्रे विक्रांत लाळे यांनी टिपली. अल्पोपहाराची व्यवस्था धनंजय पांडुरंग पाटील आणि प्रा. स्नेहा केसरकर यांनी समर्थपणे सांभाळली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संस्थापक व अध्यक्ष गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी उपस्थित कवी, अभिवाचक, आस्वादक आणि रसिकांचे आभार मानले. यावेळी त्यांनी मराठी साहित्य व कला सेवा यांच्या आगामी साहित्यिक उपक्रमांची माहिती दिली. ८ मार्च रोजी असलेल्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून २५व्या अर्थात रौप्यमहोत्सवी कविसंमेलनाची घोषणा करण्यात आली. कुसुमाग्रजांच्या विचारांना अभिवादन करणारे हे कविसंमेलन केवळ कविता सादर करण्याचे व्यासपीठ न राहता, संवेदनशील मनांची वैचारिक भेट ठरले. शब्दांच्या या समृद्ध उत्सवाने उपस्थित रसिकांच्या मनावर दीर्घकाळ टिकणारा साहित्यिक ठसा उमटवला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade