चक्रीवादळाने कामोठ्यातील मच्छी मार्केट कोलमडले
विक्रेते हतबल; नुकसानभरपाईची मागणी
पनवेल : तौक्ते चक्रीवादळाचा फटका राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे. यात कोकण किनारपट्टीचे मोठे नुकिसान झाले आहे. पनवेल शहरालादेखील सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील झाडे कोलमडून पडली तर होर्डिंग्जदेखील तुटून पडले. परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पनवेल परिसरातील नवीन वसाहत असलेल्या कामोठे येथील सेक्टर 11 याठिकाणी असणारे जय हनुमान मच्छीमार्केट वादळाच्या तडाख्याने पूर्णपणे कोलमडले आहे.
चक्रीवादळाच्या तडाख्याने पनवेलमध्ये अनेक ठिकाणी लहान गाळ्यातील दुकानांचे, भाजी विक्रेते आदींचे मोठे नुकसान झाले आहे. तौत्के चक्री वादळामुळे कामोठे येथील मैदानावर येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त मच्छी विक्रेत्यांनी स्वखर्चाने उभारलेले मार्केट अक्षरशः उध्वस्त झाले आहे. त्यामुळे येथे व्यवसाय करीत असलेल्या मच्छी विक्रेत्यांवर मोठे संकट ओढवले आहे. सोमवारी झालेल्या वादळामुळे येथील 80 हुन अधिक मच्छी विक्रेत्यांची दुकाने, बांबूंच्या आधारावर थाटलेले लाकडी गाळे, पाट, बर्फाच्या शीतपेट्या, प्रत्येक विक्रेत्याची हजारो रुपयांची मासळी यासारखे मोठे नुकसान झाल्याने विक्रेते हतबल झाले आहेत.
साधारण गेल्या 20 वर्षांपासून याठिकाणी स्थानिक प्रकल्पग्रस्त मासळी विक्रीचा व्यवसाय करतात. हे मार्केट उभे करण्यासाठी मच्छी विक्रेत्यांनी प्रत्येकी पाच हजार वर्गणी काढून येथे बांबू आणि ताडपत्रीची निवारा शेड उभारली होती. त्याचप्रमाणे येथे विजेची व्यवस्थादेखील करण्यात आली होती. तौत्के चक्रीवादळात ही शेड जमिनदोस्त झाली. त्याचबरोबर मच्छी विक्रेत्यांचे फ्रिज, मच्छी साठवण्यासाठी वापरण्यात येणारे थर्माकॉलचे डब्बे याचे नुकसान झाले असून त्यात ठेवलेली हजारो रुपयांची मच्छी खराब झाली आहे. या प्रचंड नुकसानीमुळे येथील मच्छी विक्रेत्यांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. प्रशासनाने वादळामुळे झालेल्या या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक मच्छीविक्रेत्यांनी केली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya