कांदिवली महिंद्रा कारखाना कामगार आक्रमक, सरकारी अधिकाऱ्यावर पक्षपाताचे गंभीर आरोप”
कांदिवली महिंद्रा कारखाना कामगार आक्रमक, सरकारी अधिकाऱ्यावर पक्षपाताचे गंभीर आरोप”
मुंबई-: कांदिवली येथील महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (ऑटोमोटिव्ह सेक्टर) या गेल्या ७० वर्षांपासून कार्यरत असलेल्या कारखान्यात कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, कामगार युनियनची निवडणूक घेण्याचे न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही संबंधित सरकारी अधिकारी कंपनी व्यवस्थापन आणि विद्यमान कामगार नेतृत्वाला पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप कामगारांनी केला आहे.
या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर मराठी कामगार कार्यरत आहेत. कामगारांच्या म्हणण्यानुसार, सध्याचे युनियन पदाधिकारी आणि एक कामगार नेता गेल्या २० वर्षांहून अधिक काळ कोणतीही निवडणूक न घेता पदावर कायम आहेत.
कंपनी व्यवस्थापन आणि विद्यमान युनियनच्या संगनमतामुळे कामगारांचे सातत्याने शोषण होत असल्याचा आरोप संतप्त कामगारांनी केला आहे.
या विरोधात कामगारांनी औद्योगिक न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढा दिला. या लढ्याला यश मिळाल्यानंतर न्यायालयाने युनियनची नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश दिले. या निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी उपनिबंधक, श्रमिक संघ, कोकण विभाग या पदावरील सरकारी अधिकारी श्री. अतुल सावरकर यांच्याकडे सोपविण्यात आली.
मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबविण्याऐवजी श्री. अतुल सावरकर हे कंपनी व्यवस्थापन आणि विद्यमान नेतृत्वाला अनुकूल ठरतील अशा पद्धतीने काम करत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. तसेच, कंपनीतील अधिकाऱ्यांशी त्यांचे खासगी संबंध असल्याचा आणि त्यांच्यासोबत विविध ठिकाणी वेळ घालवल्याचे कथित व्हिडिओ कामगारांपर्यंत पोहोचल्यामुळे त्यांच्या वर्तनाबाबत कामगारांनी तीव्र नाराजी आणि निषेध व्यक्त केला आहे. या सर्व प्रकारांमुळे कामगारांमध्ये भीती, संभ्रम आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणी कामगारांनी राज्याचे कामगार मंत्री श्री. आकाश फुंडकर यांना लेखी निवेदन दिले असून, महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त श्री. एच. पी. तुम्मोड यांचीही वारंवार भेट घेऊन तक्रारी सादर केल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्याच्या कथित चुकीच्या धोरणांमुळे अनेक कामगारांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, अशी भीती कामगारांनी व्यक्त केली आहे. मात्र, सरकारी यंत्रणा या प्रकरणात चालढकल करत संबंधित अधिकाऱ्याला संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, येत्या काही दिवसांत मुंबई येथील कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू असल्याचे कामगारांनी सांगितले आहे.
महिंद्रासारख्या प्रतिष्ठित औद्योगिक संस्थेमध्ये निर्माण झालेल्या या परिस्थितीचा कंपनीच्या प्रतिमेवर तसेच महाराष्ट्राच्या औद्योगिक वातावरणावर परिणाम होणार नाही का, असा प्रश्नही कामगारांनी उपस्थित केला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade