पुणे परिसरात ५० हजार कोटी रुपयांचे महामार्ग प्रकल्प
पुणे परिसरात ५० हजार कोटी रुपयांचे महामार्ग प्रकल्प
पुणे- : पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी दूर करून भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. पुण्यातील पुणे–शिरूर उन्नत द्रुतगती महामार्ग, हडपसर–यवत उन्नत महामार्ग आणि तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्ग या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, पुण्यातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत असून, पारंपरिक पद्धतीने रस्ते रुंद करणे शक्य नाही. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यात प्रथमच एकाच खांबावर खाली रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो अशी त्रिस्तरीय ‘सिंगल पिअर’ रचना उभारण्यात येणार आहे. मलेशियन तंत्रज्ञानामुळे दोन खांबांमधील अंतर १२० मीटरपर्यंत ठेवता येणार असून, त्यामुळे खांबांची संख्या कमी होऊन खर्च आणि बांधकामाचा कालावधीही कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने या प्रकल्पांसाठी राज्य जीएसटी आणि रॉयल्टीत दिलेल्या सवलतीबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच पुण्यावरील वाढता ताण कमी करण्यासाठी पुरंदर परिसरात ‘नवीन पुणे’ विकसित करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, हे प्रकल्प राज्याच्या पायाभूत सुविधा विकासात मैलाचा दगड ठरतील. नाविन्यपूर्ण बीओटी (BOT) मॉडेल अंतर्गत हे प्रकल्प राबविले जात असून, यामुळे सरकारला ९५० कोटी रुपयांचा प्रीमियम मिळणार आहे. भविष्यातील मेट्रो लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या त्रिस्तरीय रचनेमुळे मेट्रोच्या पायाभूत सुविधांवरील खर्चात सुमारे ४० टक्के बचत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन वेगाने सुरू असून, ऑगस्टपर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची एकूण लांबी १३८.१ किलोमीटर असून, ते पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर तसेच चाकण, तळेगाव आणि रांजणगाव औद्योगिक पट्ट्यांतील संपर्क अधिक वेगवान होणार आहे. वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ, इंधन खर्च आणि प्रदूषणातही घट होण्यास मदत होणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, परिवहन व सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पुणे महापौर मंजुषा नागपुरे, तसेच लोकप्रतिनिधी आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर