एल निनोच्या पार्श्वभूमीवर यंदाचा खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा : कृषी मंत्री भरणे
एल निनोच्या पार्श्वभूमीवर यंदाचा खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा : कृषी मंत्री भरणे
पुणे-: “खरीप हंगाम २०२६ शेतकऱ्यांसाठी यशस्वी आणि उत्पादनक्षम ठरावा, तसेच सन २०२६-२७ खरीप हंगामात जास्तीत जास्त क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून त्यादृष्टीने कृषी विभागाने पूर्वतयारी सुरू केली आहे. खते व बियाण्यांच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात येत आहे. यंदा एल निनोच्या पार्श्वभूमीवर हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्याचा शेती क्षेत्रावर होणारा संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची स्थिती आणि त्यानुसार पीक पद्धती यावर चर्चा करण्यासाठी खरीप हंगाम २०२६ च्या नियोजनासाठी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे,” अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
उद्या सोमवार दि.२० एप्रिल २०२६ रोजी शिवाजीनगर, बालचित्रवाणी शेजारील नव्याने बांधण्यात आलेल्या सारथीच्या सभागृहात सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे,
फलोत्पादन मंत्री भरत गोगावले,कृषी राज्यमंत्री अॅड.आशिष जयस्वाल,कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह यांच्यासह नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक,स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक,महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक,कृषी विभागाचे सर्व उपसचिव,सर्व कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक, हवामान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ,कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्थेचे संचालक,सर्व कृषी संचालक,सर्व विभागीय कृषी संचालक,सर्व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, आत्माचे सर्व प्रकल्प संचालक, सर्व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, सोलापुर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ,कृषी आयुक्तालयातील सर्व सह संचालक,कृषी उप संचालक व काही शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
पुढे माहिती देताना कृषी मंत्री भरणे म्हणाले, “आगामी खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तयारीला सुरुवात केली असून या अनुषंगाने राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत खरीप हंगामासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावेत, यासाठी आवश्यक नियोजनाबाबत चर्चा होणार आहे. तसेच जिल्हानिहाय खते व बियाण्यांचा साठा, वितरण व्यवस्था आणि संभाव्य मागणी याचाही आढावा घेतला जाणार आहे. यंदा एल निनोच्या पार्श्वभूमीवर हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्याचा शेती क्षेत्रावर होणारा संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची स्थिती आणि त्यानुसार पीक नियोजनाबाबतही कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.”
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा देशातील पर्जन्यमान हे दीर्घकालीन सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता असून ‘एल निनो’ स्थितीमुळे पावसात अनियमितता व दुष्काळ परिस्थिती उद्भवू शकते. तसेच महाविस्तार अॅप, कृषि विभागाचे यु ट्यूब, फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम, व्हाट्सअॅप चॅनेल या सोशल मिडियाच्या माध्यमातूनही हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे सुरु आहे.
खरीप हंगामपूर्व तयारी करिता क्षेत्रीय पातळीवरील अधिकारी/कर्मचारी यांच्या विभागस्तरीय व उपविभागस्तरीय कार्यशाळा राज्यात सुरु आहे. विभागीय व उपविभागीय कार्यशाळांद्वारे कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ,
केव्हीके शास्त्रज्ञ व प्रगतशील शेतकऱ्यांच्या सहभागातून Hands on Training दिली जात आहे. या सर्व उपाययोजनांच्या माध्यमातून कृषि विभाग खरीप हंगाम २०२६ मध्ये हवामानातील अनिश्चिततेशी सामना करण्यास शेतक-यांमध्ये जागृकता निर्माण करीत आहे.
मागील हंगामात राज्यातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान १०७५ मिमी असून जून २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एकूण ११७३ मिमी पाऊस नोंदविण्यात आला. हे प्रमाण सरासरीच्या १०९ टक्के इतके असल्याने राज्यात समाधानकारक पर्जन्यमान झाले होते. मागील हंगामात ऑगस्ट २०२५ मध्ये सरासरीच्या १०४ टक्के, सप्टेंबर २०२५ मध्ये १६५ टक्के, तर ऑक्टोबर २०२५ मध्ये ११४ टक्के पाऊस झाला. विशेषतः सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली असून शेतीला दिलासा मिळाला.
राज्यात सन २०२५-२६ च्या खरीप हंगामात १४३.५५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून हे प्रमाण सरासरीच्या ९९ टक्के आहे. त्यामुळे खरीप पेरणी जवळपास नियोजित क्षेत्रावर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र ५७.८० लाख हेक्टर असून सन २०२५-२६ मध्ये तब्बल ६७.२८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हे प्रमाण सरासरीच्या ११६ टक्के इतके असून रब्बी हंगामात अपेक्षेपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड झाल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमुळे फेब्रुवारी २०२५ पासून राज्यातील १३६.२८ लाख शेतकऱ्यांचे १०५.८८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून २०,१९६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कार्यशाळेत खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाच्या हेड टू टेल अधिकारी व कर्मचा-यांना आवश्यक उपाययोजना, समन्वय आणि अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या जाणार आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर