जप्तीची कारवाई सुरू होताच २ हजार ८८८ मालमत्ताधारकांनी भरला कर
जप्तीची कारवाई सुरू होताच २ हजार ८८८ मालमत्ताधारकांनी भरला कर
मुंबई - सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा तसेच थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत आतापर्यंत एकूण ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी तर ४८३ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर, एकूण २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित आहे. दरम्यान, जप्तीची कारवाई सुरू होताच एकूण २ हजार ८८८ मालमत्ताधारकांनी करभरणा केला आहे. तथापि, अद्यापही मालमत्ता करभरणा केले नसल्यास दिनांक ३१ मार्च २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरावे. अन्यथा, दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे, नागरिकांनी विहित मुदतीत करभरणा करुन महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी केले आहे.
मालमत्ता करासंदर्भात महानगरपालिका मुख्यालयात आढावा बैठक आज (दिनांक ११ मार्च २०२६) पार पडली. त्यावेळी श्रीमती जोशी बोलत होत्या. सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) श्री. विश्वास शंकरवार, सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) डॉ. गजानन बेल्लाळे यांच्यासह परिमंडळीय उपकरनिर्धारक व संकलक तसेच सर्व प्रशासकीय विभागांचे सहायक करनिर्धारक व संकलक यावेळी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) अंतर्गत आतापर्यंत जमा झालेला मालमत्ता कर आणि थकबाकी याचा बैठकीत आढावा घेण्यात आला. दिनांक १० मार्च २०२६ पर्यंत एकूण ६ हजार ०२४ कोटी रुपयांचा म्हणजे ८२.०५ टक्के मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी म्हणाल्या की, आतापर्यंत ८२.०५ टक्के मालमत्ता कर संकलित झाले असले तरी दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत १०० टक्के कर संकलित होणे अपेक्षित आहे. यासाठी करनिर्धारण व संकलन विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत. थकीत मालमत्ताधारकांविरोधात तात्काळ जप्तीची कारवाई करावी तसेच जप्त केलेल्या मालमत्तेच्या ठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी. जप्त केलेली मालमत्ता करभरणा न करता पुन्हा वापरात आल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित मालमत्ताधारकावर पोलिसांत गुन्हा नोंदवावा, असे स्पष्ट निर्देशही डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले.
दरम्यान, दिनांक १० मार्च २०२६ पर्यंत मुंबईतील एकूण ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडे एकूण ६ हजार ०८९ कोटी रुपये इतका मालमत्ता कर थकीत आहे. कारवाई सुरू होताच यापैकी एकूण २ हजार ८८८ मालमत्ताधारकांनी करभरणा केला. या मालमत्ताधारकांकडून ७८४ कोटी ३२ लाख रुपये कर संकलित करण्यात आला. आतापर्यंत एकूण ४८३ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडे ४८५ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी २९३ मालमत्ताधारकांनी ६८ कोटी ७४ लाख रुपयांचा करभरणा केला. तर, एकूण २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित आहे. या मालमत्तांवर एकूण ८८४ कोटी २४ लाख रुपयांचा कर थकीत आहे. त्यापैकी, ३४ मालमत्तांच्या विक्रीकरिता दीर्घमुदतीची नोटीस बजावण्यात असून यापैकी ५ मालमत्ताधारकांनी १० कोटी ४५ लाख रुपयांचा थकीत करभरणा केला आहे. थकबाकी असलेल्या सर्व मालमत्ताधारकांनी तसेच चालू आर्थिक वर्षाचा करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी दिनांक ३१ मार्च २०२६ पूर्वी मालमत्ता करभरणा करावा. तसेच, दंडात्मक कारवाई टाळावी. मालमत्ता करभरणा करणे प्रत्येक मालमत्ताधारकाची जबाबदारी आहे आणि ती पार पाडून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant