“तेल कमी – गॅस बचत, अधिक आरोग्य” या महत्त्वपूर्ण विषयावर पोषण जनजागृती अभियान संपन्न
“तेल कमी – गॅस बचत, अधिक आरोग्य” या महत्त्वपूर्ण विषयावर पोषण जनजागृती अभियान संपन्न
मुंबई-- International Association of Dietitians for Metabolic Health and Nutrition (IADMN) यांच्या वतीने “तेल कमी – गॅस बचत, अधिक आरोग्य” या विषयावर महिलांसाठी विशेष पोषण जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई तसेच परिसरातील विविध भागांतून आलेल्या शेकडो महिलांनी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश आत्मसात केला.
या अभियानाचा प्रमुख उद्देश महिलांमध्ये संतुलित आहार, स्वयंपाकात तेलाचा नियंत्रित वापर, एलपीजी गॅसची बचत आणि कुटुंबाच्या आरोग्याचे संरक्षण याबाबत वैज्ञानिक व पुराव्यावर आधारित माहिती पोहोचवणे हा होता.
यावेळी IADMNच्या संस्थापक संचालिका, वरिष्ठ आहारतज्ज्ञ आणि २० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या रुबी साऊंड यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. त्यांनी जास्त प्रमाणात तेलाच्या वापरामुळे वाढणारे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, फॅटी लिव्हर आणि PCOS यांसारख्या जीवनशैलीजन्य आजारांविषयी माहिती दिली. तसेच कमी तेलातही चविष्ट, पौष्टिक आणि संतुलित आहार तयार करण्याच्या सोप्या पद्धती, स्वयंपाकात गॅसची बचत करण्याचे उपाय आणि प्रत्येक महिला आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची पहिली आरोग्यदूत कशी बनू शकते, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
(व्याख्यानातील प्रमुख मुद्दे)
रुबी साऊंड यांनी ICMR च्या शिफारशीनुसार प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी दररोज सुमारे २० ते ३० मि.ली. (४ ते ६ टीस्पून) तेल पुरेसे असल्याचे सांगितले. तेल बाटलीतून थेट न ओतता चमच्याने मोजून वापरणे, तळलेल्या पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवणे तसेच वाफवणे, उकडणे, भाजणे, ग्रिल करणे किंवा एअर फ्रायरचा मर्यादित वापर यांसारख्या आरोग्यदायी स्वयंपाक पद्धती स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
याशिवाय, प्रेशर कुकरचा वापर, झाकण लावून स्वयंपाक करणे, डाळी व कडधान्ये आधी भिजवणे, उकळी आल्यानंतर गॅस मंद करणे आणि तेल पुन्हा-पुन्हा गरम करून वापरणे टाळणे या सवयींमुळे आरोग्याबरोबरच एलपीजी गॅसचीही बचत होते, असे त्यांनी सांगितले. एकाच प्रकारचे तेल सातत्याने वापरण्याऐवजी शेंगदाणा, मोहरी, तीळ, राईस ब्रॅन आणि सोयाबीन तेलाचा योग्य प्रमाणात आळीपाळीने वापर करण्याचाही सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी “मोजून तेल वापरू, तळलेले पदार्थ कमी करू, गॅसची बचत करू आणि हा आरोग्याचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवू” असा सामूहिक संकल्प केला. यावेळी महिलांना जनजागृतीपर माहितीपत्रकांचे वितरण करण्यात आले तसेच हा संदेश आपल्या कुटुंबात, शेजारी आणि समाजात पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले.
हा कार्यक्रम दादर येथील भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास केंद्रीय कामगार, रोजगार, युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
IssaADMN तर्फे भविष्यातही समाजामध्ये पुराव्यावर आधारित पोषणविषयक जनजागृती अभियान, आरोग्य शिक्षण आणि प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade