निवृत्त सहसचिव गो.श्री.पंतबाळेकुंद्री यांचे निधन
निवृत्त सहसचिव गो.श्री.पंतबाळेकुंद्री यांचे निधन
मुंबई -महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो.श्री.
पंतबाळेकुंद्री यांचे आज (सोमवार १६ मार्च २०२६) ठाणे येथे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्यावर उद्या सकाळी अकरा वाजता ठाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
एके काळी मंत्रालयात दोन पंत प्रसिद्ध होते. एक म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी तर दुसरे म्हणजे पंतबाळेकुंद्री. मंत्रालयात नगर विकासासंबंधी कोणताही मुद्दा उपस्थित झाला किंवा चर्चा झाली की सर्वांचा प्रतिसाद एकसुरी असे : पंतांना विचारा. अगदी राज भवनही यास अपवाद नसे. पंत म्हणजे कायदा पूर्ण कोळून प्यायलेले गृहस्थ. दुसरे म्हणजे त्यांची निरीच्छ वृत्ती. वास्तविक ते अशा पदावर होते की सहज अफाट संपत्ती ते कमवू शकले असते असे आजचे अनेक अधिकारी पाहिल्यावर सहजच वाटून जाते. पण सुपारीप्रेमी पंत यांनी कधीही कोणाच्याही सुपारीच्या खांडाचेही मिंधेपण स्वीकारले नाही. म्हणूनच त्यांचे म्हणणे कोणीही अमान्य करत नसे.
विविध मुख्यमंत्री, कायदे तज्ञ रामराव आदिक, शीघ्रकोपी पतंगराव कदम किंवा कठोर शिस्तीचे द.म.सुखटणकर हे सुद्धा यास अपवाद नव्हते याचे त्या काळात मंत्रालयात कार्यरत असणारे कर्मचारी आणि वृत्तसंकलन करणारे वार्ताहर प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. पंतांचे ‘आत्मभान’ हे छोटेखानी आत्मकथन वाचले की त्याचा सहज प्रत्यय येतो. मुंबई उच्च न्यायालयातही विविध प्रकरणांच्या संदर्भात पंतांचा नियमित वावर असे. त्यांनी एखादा मुद्दा शासनाच्या वतीने मांडला की न्यायालय तो सामान्यपणे उचलून धरत असे.
पंतबाळेकुंद्री आणि त्यांचे तत्कालीन वरिष्ठ म्हणजे नगर विकास सचिव डी.टी.जोसेफ यांनी अथक परिश्रम करुन मुंबई नागरी वारसा नियमावली सिद्ध केली. तिला अपेक्षेनुसार आव्हान देण्यात आले. न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांच्यासमोर ही सविस्तर सुनावणी झाली. प्रतिवादी होते गलेलठ्ठ विकासक आणि त्यांचे खंदे वकील. पण पंत सर्वांना पुरून उरले. परिणामी मुंबईचा बराच नागरी इतिहास बचावला. अन्यथा कुलाब्यापासून थेट माहीम-शीव या पट्ट्यात एकही ऐतिहासिक वास्तू वाचू शकली नसती. चहूकडे सीमेंटचे जंगल उभे झाले असते. पंतबाळेकुंद्री आणि जोसेफ ही लढाई एकहाती लढले. या दोघांचे ऋण मुंबई कधीच विसरू शकणार नाही. ही नियमावली आज देशभरातील राज्यांनी जवळपास तशीच स्वीकारली आहे. त्या अभूतपूर्व कामगिरीचा हा अल्पाक्षरी इतिहास या आत्मकथनात शब्दबद्ध केलेला आहे. पंत यांच्या निधनाने एक आदर्श लोक सेवक निजधामास गेला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade