गणेशोत्सवात चाकरमान्यांचे हाल
गणेशोत्सवात चाकरमान्यांचे हाल; २० तासांहून अधिकचा काळ वाहतूक कोंडीत
मुंबई ते कुडाळ २० तासांचा खडतर प्रवास
पनवेल ः दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबईतील चाकरमान्यांना गणेशोत्सवात कोकणातील गाव गाठण्यासाठी तब्बल २० तासांहून अधिकचा काळ वाहतूक कोंडीत अडकून पार करावे लागल्यामुळे कोकणवासीय हैराण झाले आहेत. सरकारने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत असल्याचा दावा केला होता. मात्र हा दावा वाहतूक विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे आणि रस्त्यातील खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा फोल ठरला आहे. शेकडो वाहने एकाच वेळी रस्त्यावर धावणार असल्याचे माहिती असतानाही रस्त्यातील खड्ड्यांमुळे आणि नियोजन नसल्याने कोकणात जाणाऱ्या ज्येष्ठ नागरीक, बालक आणि महिला प्रवाशांना प्रचंड हाल सहन करत खडतर प्रवासाचा अनुभव गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत आला.
११ दिवसांपूर्वी याच महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करुन खड्डे बुजविण्याचे आदेश प्रशासनाला दिल्यानंतरही परिस्थिती बदलू शकली नाही. गुरुवारी रात्री ९ वाजल्यापासून मुंबईतून कोकणातील विविध तालुक्यांमध्ये मुंबई गोवा महामार्गावरुन धावणाऱ्या वाहनांना या कोंडीचा सर्वात मोठा फटका सहन करावा लागला. शुक्रवारी सायंकाळी साडेचारवाजेपर्यंत ही वाहने राजापूर तालुक्यापर्यंत पोहोचू शकली नव्हती. एरव्ही मुंबई ते कुडाळ या ८ ते ९ तासांच्या प्रवासाला तब्बल दुप्पट काळ लागल्याने प्रवाशांची कोंडी झाली. रात्री रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे रात्री १० वाजता मालाड येथील प्रताप सावंत त्यांच्या कुटुंबियांना घेऊन खासगी वाहनाने कुडाळ येथे निघाले होते. परंतु सकाळी सात वाजेपर्यंत प्रताप यांची मोटार रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यापर्यंत वाहतूक कोंडीत अडकली होती. तसेच संगमेश्वर येथेही अशीच कोंडी अनुभवायला मिळाली. ही कोंडी कधी फुटणार नेमके याचे उत्तर देण्यासाठी कोणतेही स्वयंसेवक किंवा इतर यंत्रणा वाहतूक विभागाने उभारली नव्हती.
प्रताप सावंत यांच्या कुटुंबियांप्रमाणे शेकडो वाहनांमधील महिला, बालक तसेच ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक कोंडीमध्ये त्रास सहन करावा लागल्याची माहिती कुडाळ येथे जाण्यासाठी निघालेल्या श्रावणी सावंत यांनी दिली. सरकारला जुना मुंबई गोवा महामार्गाचे कॉंक्रीटीकरण झपाट्याने करण्यापेक्षा नवीन रेवस ते रेड्डी या द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनात रस असल्याची टीका शुक्रवारी वाहतूक कोंडीत अडकलेल्या कोकणवासीयांकडून केली जात होती.
गणेशोत्सवात श्रीफळ महागले
आवक वाढूनही गणेशोत्सवात श्रीफळ महाग झाले आहे.
महाराष्ट्रातील कोकणपट्टीचा विचार करता 1987 ते 2019 या 33 वर्षांत नारळाचे क्षेत्र 6900 हेक्टरवरून 43,320 हेक्टरवर पोहोचले आहे. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत नारळ धोरणात आमूलाग्र बदल करण्यात आल्याने कोकणातील नारळ उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एकट्या कोकणातून 18.63 कोटी नारळाचे उत्पादन झाले होते. ठाणे मुंबईला सर्वाधिक नारळ पुरवणारा प्रदेश म्हणूनही कोकण किनारपट्टीकडे पाहिले जाते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त
गणेशोत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा आणि संवेदनशील ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांच्या गस्तीसोबतच सीसीटीव्ही कॅमेरे, वॉच टॉवरच्या सहाय्याने करडी नजर ठेवण्यात येणार आहे. शहरात ३२ उपायुक्त, ४५ सहाय्यक पोलीस आयुक्तांसह २४३५ पोलीस अधिकारी व १२ हजार ४२० कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणारआहेत. याशिवाय राज्य राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, तसेच गृहरक्षक दल यांनाही महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय मेटल डिटेक्टर, श्वान पथक, बाॅम्ब शोधक व नाशक पथकांच्या माध्यमातूनही महत्त्वाच्या ठिकाणी नियमित तपासणी करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव मंडळाच्या स्वयंसेवकांना ‘सीपीआर’ प्रशिक्षण
गणेशोत्सवात गणेश दर्शनानिमित्त उसळणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. गर्दीमध्ये एखाद्या भाविकाला अचानक हृदयविकाराचा त्रास होऊन तो बेशुद्ध पडल्यास कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन म्हणजेच हृदयाचे पुनरुज्जीवन (सीपीआर) केल्यास त्याचे प्राण वाचण्याची शक्यता असते. त्यामुळे मुंबईतील नामांकित गणेशोत्सव मंडळातील स्वयंसेवकांना एका खासगी रुग्णालयाकडून सीपीआरचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE