बृहन्मुंबई क्षेत्रात स्वच्छतेसंदर्भात प्रभावी अंमलबजावणीसाठी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांचे निर्देश
बृहन्मुंबई क्षेत्रात स्वच्छतेसंदर्भात प्रभावी अंमलबजावणीसाठी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांचे निर्देश
मुंबई - स्वच्छता राखणे आणि स्वच्छतेच्या सवयी अंगिकारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वच्छता असेल तर अन्य सर्व विकासात्मक बाबींचे महत्त्व आहे. त्यामुळे, बृहन्मुंबई क्षेत्रात स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष (वॉर रुम) स्थापन करावे. तसेच, स्थानिक स्तरावर योग्यप्रकारे स्वच्छता होत असल्याची खात्री करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागांच्या सहायक आयुक्तांनी नियमितपणे क्षेत्र भेटी द्याव्यात, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विविध प्रकल्प, उपक्रम आणि कामकाजाचा आढावा महानगरपालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत आज (दिनांक ०९ एप्रिल २०२६) घेण्यात आला. त्यावेळी श्रीमती भिडे बोलत होत्या.
उप आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर, संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे पुढे म्हणाल्या, स्वच्छता ही नियमित प्रक्रिया आहे. सबब, ती नियमितपणे तितक्याच प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. मुंबईतील सागरी किनारी रस्ता, महामार्गांवर सूक्ष्म पद्धतीने स्वच्छता व्हायला हवी. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे, याठिकाणी यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र वाहने हवीत. या मार्गांवर स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या विविध बाबी अंतर्भूत असणारी विशेष वाहने (कस्टमाईज्ड व्हेईकल) तयार करण्यासाठी उत्तम संस्थांची मदत घ्यावी. काही वर्दळीची ठिकाणे स्वच्छतेच्या दृष्टीने उत्तम बनवावीत आणि मग तिथे तशीच स्वच्छता कायम राहील, यासाठी नागरिकांना जागरुक करावे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभाग अंतर्गत कचरा संकलनासाठी आणलेल्या अद्ययावत वाहनांपैकी दहा टक्के वाहने ही इलेक्टॉनिक (ई-व्हेईकल) आहेत. घनकचरा संकलनाच्या कामासाठी मोठ्या क्षमतेची इतक्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वाहने वापरणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगरपालिका आहे, असेही श्रीमती अश्विनी भिडे यांनी यावेळी सांगितले. तसेच, स्वच्छतेप्रती नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिकेकडून आयोजित ‘मुंबई क्लीन लीग’ या स्पर्धेत नागरिक तसेच आस्थापनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विविध प्रकल्प, उपकरण, कामकाज आदींबाबत उप आयुक्त श्री. किरण दिघावकर यांनी सविस्तर सादरीकरण केले. यावेळी ते म्हणाले की, सध्या महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतून सुमारे ७२०० मेट्रिक टन घनकचरा संकलित करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. संपूर्ण मुंबईत उत्तमप्रकारे स्वच्छता राखण्यासाठी सेवा आधारित (सर्व्हिस बेस्ड) कंत्राट पद्धती अवलंबण्यात आली आहे. तसेच, घनकचरा संकलन व वहनाच्या अनुषंगाने नवीन वाहने आणली आहेत. पूर्वी यासाठी १ हजार १९६ वाहने कार्यरत होती. पण, नव्याने आलेल्या वाहनांमध्ये क्षमतावृद्धी केल्याने आता या वाहनांची सख्या ९८८ वर आली आहे. तसेच, त्यांची रंगसंगतीही बदलण्यात आली आहे. मुंबईत ४६ ठिकाणी सुका कचरा विलगीकरण केंद्र आहेत. तर, ९४ वाहने यासाठी पूर्णवेळ कार्यरत आहेत. घरगुती काळजीयोग्य कचरा (डोमेस्टिक सॅनिटरी वेस्ट) संकलनासाठी महानगरपालिकेकडून विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ अनेक आस्थापनांकडून प्रभावीपीणे घेतला जात आहे, अशी माहितीही श्री. दिघावकर यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant