ऑर्थोपेडिक डॉक्टरांच्या कमतरतेमुळे विक्रोळीतील महात्मा फुले रुग्णालयात रुग्णांची गैरसोय
ऑर्थोपेडिक डॉक्टरांच्या कमतरतेमुळे विक्रोळीतील महात्मा फुले रुग्णालयात रुग्णांची गैरसोय
मुंबई - विक्रोळी कन्नमवार नगर येथील मुंबई महानगरपालिकेच्या क्रांतिज्योती महात्मा फुले सर्वसाधारण रुग्णालयात ऑर्थोपेडिक (अस्थिरोग) डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची बाब समोर आली आहे.
डॉ. योगेश भालेराव यांच्यासह दिशा वेल्फेअर ग्रुप आणि विक्रोळी विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाचे डीन डॉ. जाधव यांची भेट घेऊन सद्य परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ऑर्थोपेडिक विभागातील एका डॉक्टरांनी नुकतेच राजीनामा दिल्याने सध्या केवळ एकच डॉक्टर उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. दुसऱ्या डॉक्टरांच्या नियुक्तीसंदर्भात प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले की, महानगरपालिकेच्या धोरणानुसार डॉक्टरांची भरती ही कंत्राटी (Contract) पद्धतीने केली जाते. मोठ्या रुग्णालयांमध्ये मेडिकल कॉलेज व प्राध्यापक उपलब्ध असल्याने सेवा सुरळीत चालते; मात्र छोट्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता भासल्यास रुग्णांना त्रास सहन करावा लागतो.
तसेच, महानगरपालिका वर्षातून केवळ एकदाच सीएमएस (CMS )मार्फत कंत्राटी डॉक्टरांची भरती करते. त्या वेळी डॉक्टरांना आपल्या पसंतीचे रुग्णालय निवडण्याची मुभा असल्याने अनेक डॉक्टर सोयीस्कर ठिकाणे निवडतात, परिणामी काही रुग्णालयांमध्ये पदे रिक्त राहतात.
दरम्यान, रुग्णालयात नूतनीकरणानंतर अत्याधुनिक आयसीयू तयार असूनही डॉक्टरांच्या अभावामुळे ते सुरू करता येत नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. “क्रिकेट खेळण्यासाठी बॅट-बॉल आहे, पण खेळाडू नाहीत”, अशी परिस्थिती असल्याचे उदाहरण यावेळी देण्यात आले.
याशिवाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रस्तुतीगृह येथे सोनोग्राफी मशीन उपलब्ध नसून ते मिळण्यासाठी साधारणतः एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. तोपर्यंत नागरिकांना अन्य ठिकाणी जावे लागणार असल्याने त्यांची फरफट होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन रुग्णांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
या भेटीदरम्यान दिशा वेल्फेअर ग्रुपचे अध्यक्ष दिनेश बेरीशेट्टी, रविंद्र वाघमारे, जोहीब चुडावाला, राजन कोळी तसेच विक्रोळी विकास मंचचे अध्यक्ष संजय येवले, राजाराम राव, आयवन डिसोझा आदी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर