पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी : पट्टशिष्यांनी वाहिली सप्तसुरांची स्वरांजली!
पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी : पट्टशिष्यांनी वाहिली सप्तसुरांची स्वरांजली!
मुंबई - १६ मे १९२६ रोजी माणिक वर्मा पुण्यात एका संगीताची आवड असलेल्या कुटुंबात (पूर्वाश्रमीच्या माणिक दादरकर) जन्मलेल्या तसेच किराणा आणि आग्रा घराण्याच्या शैलीत पारंगत असलेल्या माणिक वर्मा यांची जन्मशताब्दी १६ मे रोजी सुरु होत आहे. परंतु एक महिन्या आधीच त्यांच्या पट्टशिष्यांनी पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सप्तसुरांची उधळण करीत स्वरांजली अर्पण करून बाजी मारली आहे.
पद्मश्री माणिक वर्मा या हिंदुस्तानी शास्त्रीय आणि मराठी सुगम संगीतातील अत्यंत लोकप्रिय आणि दिग्गज गायिका म्हणून सुपरिचित आहेत. माणिक वर्मा यांनी भावगीते, भजने आणि नाट्यसंगीतातून अफाट लोकप्रियता मिळवली. ख्याल, ठुमरी अशा शास्त्रीय संगीतातील सर्वच प्रकारच्या गायनांनी समृद्धी मिळवितांना रसिक श्रोत्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केले.
१९७४ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी सुरेशबाबू माने, अब्दुल रहमान खान आणि हिराबाई बडोदेकर यांसारख्या दिग्गजांकडून संगीताचे शिक्षण घेतले शास्त्रीय संगीतासोबतच, त्यांचे ‘भावगीत’ (उदा. ‘संवळा रंग तुझा’, ‘हसले मनी चांदणे’) गायन खूप प्रसिद्ध होते त्यांचे पती अमर वर्मा हे लेखक/गीतकार होते. त्यांच्या कन्या राणी वर्मा, अरुणा जयप्रकाश, अभिनेत्री भारती आचरेकर आणि अभिनेत्री वंदना गुप्ते या लोकप्रिय असून आपापल्या क्षेत्रात त्यांनी प्रगतीची अत्युच्च शिखरे पादाक्रांत केली आहेत.
बोरीवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात स्वररंग प्रतिष्ठान, स्वरार्चना म्युझिक क्लब यांनी संयुक्त विद्यमाने पद्मश्री माणिक वर्मा यांच्या पट्टशिष्या अर्चना कान्हेरे, त्यांचा शिष्य परिवार आणि बकुल पंडित यांनी सप्तसुरांची स्वरांजली अर्पण केली. पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या अष्टपैलूत्वावर प्रकाश टाकणारा आणि संजय देसाई, श्रीकृष्ण कुलकर्णी आणि विजय तारी यांनी आयोजित केलेल्या या सप्तसुरांची उधळण करणाऱ्या कार्यक्रमात अर्चना कान्हेरे, बकुळ पंडित यांच्या सह मीनल दातार, स्वाती राईलकर, अपूर्वा रानडे, मंजू दिवाडकर, बागेश्री पांचाळे गायकवाड (गझलसम्राट भीमराव पांचाळे यांच्या सुकन्या), प्रिया आठल्ये, वैदेही मेकडे, त्रिशा शेट्टी, सायली सावरकर, मधुरा वालावलकर, सागर मेस्त्री, अबोली गद्रे, हृषिकेश नार्वेकर यांनी शास्त्रीय संगीतातील विविध प्रकारची गाणी सादर केली.
माणिकताईंची ठसकेबाज लावणीही यावेळी सादर करण्यात आली. गाण्यांच्या या मैफिलीत सौरभ कानुलकर, तन्मय मेस्त्री, संतोष पवार, प्रसन्ना गावडे, ओंकार अग्निहोत्री या वादकांच्या दिलखेचक वादनांनी सप्तसाज चढविले. अस्मिता पांडे यांचे समयोचित सूत्रसंचालन, निवेदन रसिक श्रोत्यांना आपापल्या आसनांवर खिळवून ठेवण्यासाठी गायकांना उत्तम सहाय्य झाले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुभाष देसाई, गिरगांव कट्टाचे प्रदीप मालंडकर, प्रबोधन गोरेगांवचे अध्यक्ष नितीन शिंदे यांनी प्रमुख पाहुणे या नात्याने पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करतांनाच माणिकताईंच्या पट्टशिष्यांनी सादर केलेल्या गीतगायनांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते अर्चना कान्हेरे यांचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे आजकालच्या डी जे आणि धांगडधिंगा यांच्या सर्वत्र सुरु असलेल्या विटंबनेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक रसिक श्रोता प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरातून कर्णकुंडले तृप्त करीत आपापल्या घराकडे निघाला होता.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant