विक्रोळीतील पीएपी घोटाळा “मतदारांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच”
विक्रोळीतील पीएपी घोटाळा “मतदारांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच” : आमदार सुनील राऊत यांचा इशारा
मुंबई - विक्रोळी मतदारसंघातील नागरिकांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका घेत आमदार सुनील राऊत यांनी विधानसभेत मोठा मुद्दा उपस्थित करत रुणवाल बिल्डरशी संबंधित कथित पीएपी घोटाळा उघडकीस आणला. “जोपर्यंत माझ्या मतदारांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही,” असा ठाम इशारा देत राऊत यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
विक्रोळीतील ३२ एकर जागेवर रुणवाल बिल्डरकडून सुरू असलेल्या मोठ्या विकास प्रकल्पात प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल (PAP) साठी राखीव घरे सरकारला न देता थेट विक्री केल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला. नियमांनुसार, अशा प्रकल्पांमध्ये भविष्यातील शासकीय कामांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी घरे उपलब्ध करून देणे बिल्डरला बंधनकारक असते. मात्र, संबंधित प्रकल्पात रुणवाल बिल्डरने पीएपी साठी बांधलेली इमारत सरकारकडे सुपूर्द न करता खाजगी ग्राहकांना प्रत्येकी ७० ते ८० लाख रुपयांना विकल्याचा आरोप त्यांनी सभागृहात मांडला.
रस्ता रुंदीकरणासाठी बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर महापालिकेकडे पाठपुरावा करताना हा प्रकार समोर आल्याचे राऊत यांनी सांगितले. या गैरप्रकारामुळे सध्या पुनर्वसनासाठी घरे उपलब्ध नसल्याने रस्ता रुंदीकरणाचे काम अडचणीत आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी राऊत यांनी सरकारला थेट सवाल करत, “सरकारी हक्काची घरे विकणाऱ्या रूणवाल बिल्डरवर फौजदारी गुन्हा दाखल होणार का? तसेच या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून चौकशी होणार का?” असे प्रश्न उपस्थित केले.
या चर्चेला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तीन महिन्यांत सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, विक्रोळीतील नागरिकांच्या हक्कासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत आमदार सुनील राऊत यांनी हा मुद्दा पुढेही आक्रमकपणे लावून धरणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणामुळे बांधकाम क्षेत्रातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant