प्रभाग २०४ साठी विकासाचा आराखडा मांडताना शिवसेना उमेदवार अनिल कोकिळ यांची १० कलमी विकास गॅरंटी
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग २०४ मधून शिवसेनेचे उमेदवार अनिल कोकिळ यांनी नागरिकांसमोर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी १० कलमी विकास गॅरंटी सादर केली आहे. पुढील पाच वर्षांच्या कालावधीत प्रभागातील मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धार त्यांनी या गॅरंटीच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
प्रभागातील जुन्या चाळी आणि इमारतींच्या पुनर्विकासाला प्राधान्य देण्यावर या गॅरंटीमध्ये भर देण्यात आला आहे. वाकडी चाळ आणि पानवाला चाळ येथील अनेक वर्षांपासून इतरत्र स्थलांतरित झालेल्या रहिवाशांना मूळ जागीच पुनर्विकासाच्या माध्यमातून हक्काची घरे मिळवून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. शापूरजी पालनजी वसाहतीतील झोपडपट्टीचा एसआरए अंतर्गत प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्याचा समावेशही या आराखड्यात आहे. तसेच प्रभागातील म्हाडा इमारती, पगडी सिस्टमवरील इमारती, २० ते २५ वर्ष जुन्या तसेच मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासातून १५० ते २०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरांऐवजी ४०० ते ५०० चौरस फुटांची घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट मांडण्यात आले आहे. बेस्ट वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत लवकर निर्णय घेऊन कामगारांसाठी चांगली घरे उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावही यामध्ये आहे.
गटर व ड्रेनेज यंत्रणेच्या सुधारणांसाठी शापूरजी पालनजी वसाहतीतील कल्पतरू इमारतीतून येणाऱ्या सांडपाण्यामुळे निर्माण होणारी पाणी तुंबण्याची समस्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेज यंत्रणा उभारून सोडवण्याचा विचार मांडण्यात आला आहे. आंबेवाडी–लोढा टॉवर परिसरातील गटार यंत्रणेचे अद्ययावतीकरण करण्यासह ‘आपली आंबेवाडी – स्वच्छ आंबेवाडी’ ही मोहीम राबवून कचऱ्याची प्रभावी विल्हेवाट लावण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.
शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रात साईबाबा म्युनिसिपल शाळा नव्याने बांधून अद्ययावत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. प्रभागातील सर्व महापालिका शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, पायाभूत सुविधा सुधारणे आणि मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडू नयेत यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. स्थानिक तरुणांसाठी कौशल्य विकास केंद्र तसेच रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्याचाही यात समावेश आहे.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण, डॉ. विजयकुमार वाळिंबे रस्ता पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या बाजूने रूंद करणे, आंबेवाडीतील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, दत्ताराम लाड मार्गावरील जड वाहनांची वाहतूक बंद करणे तसेच इमारतींच्या प्रवेशद्वारांवर कमानी उभारण्याचे प्रस्ताव पायाभूत सुविधांच्या विभागात नमूद करण्यात आले आहेत.
आरोग्य सेवांच्या आधुनिकीकरणासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य योजना, विरंगुळा केंद्रे आणि व्यायामासाठी आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्याचा विचार मांडण्यात आला आहे. महिला सक्षमीकरणासाठी महिला गृहउद्योगांना प्रोत्साहन आणि आर्थिक सहाय्य देण्याचा मुद्दाही या गॅरंटीचा भाग आहे.
क्रीडा आणि उद्यानांच्या विकासासाठी सुसज्ज उद्यानांची निर्मिती, आरक्षित मैदानांमध्ये सुविधा उपलब्ध करून देणे, वर्धमान इस्टेट (लालबाग) आणि मेघवाडी परिसरात मनोरंजन उद्यान व जलतरण तलाव उभारणे, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (गरमखाडा) तसेच चिंतामण परब उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
सेवाव्रती शिवसैनिकांच्या स्मृती जपण्यासाठी कै. विठ्ठल चव्हाण आणि माजी नगरसेवक कै. नागेश पवार यांच्यासारख्या व्यक्तींच्या स्मरणार्थ सांस्कृतिक केंद्रे, वाचनालये आणि स्मारके उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. यासोबतच लालबाग–परळ परिसरातील कलावंतांसाठी भव्य नाट्यगृह उभारून त्याला स्व. विठ्ठल चव्हाण यांचे नाव देण्याचा प्रस्तावही या विकास आराखड्यात समाविष्ट आहे.
प्रभाग २०४ साठी मांडण्यात आलेली ही १० कलमी विकास गॅरंटी नागरी सुविधा, सामाजिक बांधिलकी आणि दीर्घकालीन नियोजन यांचा समन्वय साधणारी असून, नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर उपाय सुचवणारी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant