तीस वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देण्यासाठी बदलाची हाक : प्रभाग २०५ मधून वर्षा गणेश शिंदे यांच्या उमेदवारीकडे जनतेचे लक्ष
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २०५ मधील अभ्युदयनगर, जिजामातानगर व परिसरात गेली तीन दशके रखडलेल्या पुनर्विकास, गृहनिर्माण, पाणीपुरवठा, गटार व्यवस्था, रस्ते तसेच मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः ठप्प झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना–आरपीआय महायुतीच्या उमेदवार वर्षा गणेश शिंदे यांच्या प्रचारादरम्यान या भागातील वास्तव परिस्थिती पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे.
जिजामातानगरमध्ये अनेक कुटुंबे तब्बल तीस वर्षांपासून झोपडपट्टीत वास्तव्यास असून आज तिसरी पिढीही त्याच असुरक्षित व अनिश्चित परिस्थितीत जीवन जगत आहे. हक्काचे घर, स्वच्छ पिण्याचे पाणी, सुरक्षित गटार व्यवस्था, सुलभ रस्ते आणि मूलभूत नागरी सुविधा यांपासून नागरिक वंचित आहेत. याचा थेट परिणाम सामाजिक जीवनावर होत असून मुलींची लग्ने रखडत आहेत, युवकांचे भविष्य अंधारात आहे आणि अनेक कुटुंबे मानसिक व सामाजिक कोंडीत सापडली आहेत. लोकप्रतिनिधी मराठी माणसाच्या भावनांशी खेळतात; मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल घडत नाही, अशी तीव्र भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
प्रचारादरम्यान विविध वस्त्यांमध्ये फिरताना उघडी गटारे, तुंबलेले नाले, अपुरी स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि मोडकळीस आलेली घरे हे वास्तव स्पष्टपणे दिसून आले. आजूबाजूला उंच इमारती उभ्या राहत असताना या भागातील नागरिकांना मात्र अद्याप मूलभूत सुविधाही मिळालेल्या नाहीत, ही बाब प्रकर्षाने जाणवते. ज्यांना कधीच पाणी, रस्ता, घर किंवा गटाराचा प्रश्न भेडसावत नाही, तेच लोक वर्षानुवर्षे निवडून येतात, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर अभ्युदयनगर पुनर्विकासाचा प्रश्न, २०८ घरांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव, ६४१ चौरस फुटांचा कार्पेट एरिया असलेली २ बीएचके घरे, पार्किंग सुविधा तसेच संपूर्ण नागरी पायाभूत विकास याबाबत ठोस व कालबद्ध निर्णय होणे अत्यावश्यक असल्याचे मत प्रचारादरम्यान मांडले जात आहे. राज्य सरकारकडून आवश्यक कॉर्पस फंड उपलब्ध करून देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.
महायुतीच्या उमेदवार वर्षा गणेश शिंदे या स्वतः अभ्युदयनगरच्या रहिवासी असून या परिसरातील समस्या त्यांना केवळ ऐकून नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून माहीत असल्याचे प्रचारादरम्यान स्पष्ट झाले. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कष्टकरी वर्गासाठी रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास, महिला सक्षमीकरण तसेच नागरी सुविधा सुधारण्याचा संकल्प त्यांच्या प्रचारातून मांडण्यात आला आहे. दहावी नापास युवकांपासून ते पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणांपर्यंत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उद्योग व योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केल्याचा उल्लेखही यावेळी करण्यात आला.
राज्यात व केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘विकासपुरुष’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राला विकासाच्या बाबतीत अग्रस्थानी नेण्याचा त्यांचा प्रयत्न असून मुंबईकरांना दर्जेदार नागरी सुविधा देण्याचा सरकारचा दृष्टिकोन असल्याचे प्रचारात नमूद करण्यात आले. विकासासाठी केवळ इच्छाशक्ती नव्हे, तर राजकीय बळही आवश्यक असल्याचे सांगत, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीला संधी देण्याचे आवाहन करण्यात आले.
हार–जीत हा निवडणुकीचा भाग असला, तरी चुकीचा निर्णय घेतल्यास त्याचा फटका पुढील पिढीला बसतो, अशी भूमिका मांडत भावनिक आवाहनांना बळी न पडता गेल्या तीस वर्षांचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा तपासण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले. बदल हवा असेल, तर सक्षम आणि काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी देणे आवश्यक असल्याचेही प्रचारातून अधोरेखित करण्यात आले.
१५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अभ्युदयनगर, जिजामातानगर व परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि कष्टकरी वर्गाच्या भवितव्यासाठी विकासाचा मार्ग निवडण्याचा संदेश प्रचारातून दिला जात असून, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २०५ मधून भाजप–शिवसेना युतीच्या उमेदवार वर्षा गणेश शिंदे यांच्या उमेदवारीकडे नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant