Breaking News
*मानवाधिकार आयोगाकडे जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रने केली लेखी तक्रार*
मुंबई - महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांचे पत्रकार व वृत्त छायाचित्रकार तसेच चित्रवाहिनीचे रिपोर्टर व कॅमेरामन यांना आपले कर्तव्य पार पाडीत असताना त्यांना राजकीय पुढारी व त्यांचे हस्तक तसेच गुंडप्रवृत्तीच्या लोकांपासून होणा-या त्रासांचा सामना करावा लागत असतो.प्रसंगी मारहाणीलाही सामोरे जावे लागत असते.केवळ पत्रकार म्हणूनच नव्हे तर सामान्य माणूस म्हणून त्यांना असणा-या मानवी अधिकारांची अशा प्रवृत्तींकडून पायमल्ली होत असते.अशा मानवी अधिकारांचे हनन करणा-यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रने मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष तसेच निवृत्त. न्यायाधीश मा.एम.बदर यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
८ डिसे़बर २०१९ रोजी महाराष्ट्र सरकारने पत्रकार संरक्षण कायदा संमत केला व पत्रकारासाठी अशाप्रकारचा कायदा करणारे महाराष्ट्र सरकार हे पहिले राज्य असल्याचे सांगत आपले ढोल बडवून घेतले. परंंतु या कायद्याची अंमल बजावणी करण्यात यावी असे नोटीफिकेशन सरकारने न काढल्यामुळे पत्रकारावर हल्ले करणा-यांवर कोणतीही कारवाई होत नाही परिणामी हल्लेखोर मोकाट सुटतात.यामुळे समाजात अशाप्रकारची प्रवृत्ती दिवसेदिवस बळावू लागली आहे.अशा प्रवृत्तींना आळा घालून मानवी हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी अशा लोकांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे महाराष्ट्र अध्यक्ष नारायण पांचाळ व महाराष्ट्र संघटन सचिव राजेंद्र साळसकर यांनी मानवी अधिकार आयोगाचे अध्यक्ष एम.बदर यांच्याकडे लेखी तक्रारी केली असून दोषींवर कारवाई करून हल्ला झालेल्या पत्रकारांसाठी न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पत्रकार, छायाचित्रकार व विशेषत: चित्रवाहिनीचे रिपोर्टर आणि कॅमेरामन यांच्यावरील हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत.
६ सप्टेंबर रोजी साम टिव्हीचे पत्रकार विकास मिरगणे हे गणपती विसर्जनाचे वार्तांंकन करण्यासाठी गिरगाव चौपाटी येथे आपल्या टीमसह गेले असता गाडी पार्क करण्याच्या क्षुल्लकशा कारणावरून एपीआय श्री.शांताराम नाईक या पोलीस अधिका-याने पत्रकार मिरगणे यांच्या कानशिलात लगावली. एपीआय शांताराम नाईक यांनी कोणत्या अधिकाराने पत्रकार मिरगणे यांच्या कानशिलात लगावली.मिरगणे यांनी गाडी चुकीच्या जागी पार्क केली असल्यास जो काही कायदेशीर दंड आहे तो ते न आकारता पत्रकाराला मारहाण करणे कोणत्या कायद्यात बसते.याबाबत जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस व मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे लेखी तक्रार केली असून यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.
त्याचबरोबर २० सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजनासंबंधी साधु-महंतांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी नाशिक येथून त्र्यंबकेश्वर येथे काही पत्रकार गेले होते.त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणा-या भाविकांना टोल भरावे लागत असते.परंतु आपण पत्रकार आहोत आणि साधु-महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी आलो आहोत असे सतत सांगूनही या टोल नाक्यावरील वसुली कर्मचारी काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते.हे पत्रकार वरिष्ठांना फोन करीत असतानाच टोल वसुली करणा-या गुंडप्रवृत्तीच्या कर्मचा-यांनी या पत्रकारांना गाडीच्या बाहेर ओढून , दगड, लाठ्या व लोखंडी रॉडने मारहाण करावयास सुरूवात केली.
या हल्ल्यात झी24 चे योगेश खरे व पुढारी न्यूजचे किरण ताजणे, अभिजित सोनावणे आणि अन्य दोन पत्रकार यात जखमी झाले असून यातील पुढारी न्यूजचे पत्रकार किरण ताजणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तेथील अपोलो रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
राज्याच्या मुख्यंमत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई चे आदेश दिले असून याप्रकरणी चौघांना अटक झाली आहे.या गुन्ह्यात दोषींना अटक झाली असली तरी पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीचे २०१९ पासून नोटिफिकेशन निघालेले नसल्यामुळे दोषी व्यक्ती कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन काही दिवसात मोकाट सुटतील.
तेव्हा या दोन्ही गुन्ह्यातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी जेयुएमचे महाराष्ट्र अध्यक्ष नारायण पांचाळ व महाराष्ट्र संघटन सचिव राजेंद्र साळसकर यांनी मानवी अधिकार आयोगाचे अध्यक्ष एम. बदर यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर