Breaking News
पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने राहणार बंद
मुंबई - जैन समाजासाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या पर्यूषण काळात दोन दिवस म्हणजेच २४ आणि २७ ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.पर्यूषण पर्वाला मंगळवारपासून सुरुवात झाली असून कत्तलखाने बंद ठेवण्याबाबतची माहिती मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. जैन समाजासाठी पर्यूषणकाळ पवित्र मानला जातो. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे शेठ मोतीशॉ लालबाग जैन चॅरिटीज आणि शेठ भेरूलालजी कन्हैयालालजी कोठारी धार्मिक ट्रस्टने केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी महापालिकेच्या वकिलांनी ही माहिती दिली.
पर्यूषण काळात नऊ दिवसांऐवजी एकच दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याच्या महानगरपालिका आयुक्तांच्या ३० ऑगस्ट २०२४ रोजीच्या निर्णयाला याचिकाकर्त्यांनी आव्हान दिले होते. त्यानंतर आता सुधारित आदेशात पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यूषण पर्वातील नऊ दिवसांच्या कालावधीत प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी देणे, हे जैन धर्माच्या भावनांचे उल्लंघन आहे. तसेच, धर्माच्या हेतूला धक्का पोहोचवणारे आहे, असा दावा याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला.
याचिकाकर्त्यांच्या मागणीच्या कायदेशीर वैधतेबाबत न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला. कोणत्या वैधानिक तरतुदींतर्गत कत्तलखाने नऊ दिवस बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत? अशी विचारणाही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केली होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade