Breaking News
*राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी निवड
*चांगल्या संकल्पना घेऊन संघांचा गाडा पुढे नेऊ*
*अध्यक्षपदी निवडीनंतर आमदार दरेकरांचे प्रतिपादन*
मुंबई - १०६ वर्षांची वैभवशाली परंपरा असलेली सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशी संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी भाजपा गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी अर्जुनराव बोरुडे, मानद सचिवपदी रामदास मोरे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, चांगल्या संकल्पना घेऊन राज्य सहकारी संघाचा गाडा पुढे नेऊ असे प्रतिपादन आमदार दरेकर यांनी निवडीनंतर केले.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना आमदार प्रविण दरेकर म्हणाले कि, मागील निवडणुकीत झालेल्या गोष्टी सहकारासाठी योग्य नाहीत. सहकारी संघाला उर्जीतावस्था देण्याची गरज आहे या उमेदीने संजीव कुसाळकर यांनी पुढाकार घेतला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितले. अशा पद्धतीने आपण निर्विवाद असे बहुमत मिळवले. देवाभाऊ आपल्या पाठीशी असल्याने हे यश आपल्याला मिळाले आहे. आपण सर्वांनी सहकारासाठी काम केले पाहिजे अशी प्रगल्भ भूमिका घेतलीत. त्यातून आज सोनियाचा दिवस दिसतोय. मी ज्या-ज्या ठिकाणी संस्थेत गेलो तेथे त्या पदाची उंची वाढविण्याचे काम केले. संस्थेला अडचणीतून बाहेर काढून ती सशक्त केली हा इतिहास आहे. २५ वर्ष मुंबई जिल्हा बँकेचे सर्वांना एकत्रित घेऊन नेतृत्व करतोय. काही कटुता आल्या असतील मात्र त्याही दुरुस्त करून आज बँक राज्यातील उत्तम बँक म्हणून चालवतोय. बँकेच्या माध्यमातून अनेक योजना मुंबईकरांना दिल्या असल्याचेही दरेकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले कि, आज राज्यातील सहकाराची अत्यंत बिकट अवस्था आहे. अनेक राजकीय नेते सहकारातून मोठे झाले. मात्र विधिमंडळाच्या सभागृहात जे कार्यकर्ते सहकारात एकत्रित मतदान करतात त्यांची कुणी बाजू घेतली नाही परंतु मी सहकाराच्या बाजूने ताकदीने भूमिका मांडण्याचे काम केले आहे. ज्या राज्य सहकारी संघाची स्थापना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या उपस्थितीत झाली त्या संघाला पुन्हा वैभवाचे दिवस आणायचे आहेत. राज्यात जेवढी सहकार क्षेत्र आहेत त्यातील सर्व अडचणी सोडवू. राज्यातील शिखर संस्था म्हणून आपल्याला भूमिका घेणे गरजेचे आहे. सरकारकडून ज्या गोष्टी हव्या असतील त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करू. चांगल्या संकल्पना घेऊन संघांचा गाडा पुढे नेऊ, असा विश्वासही दरेकरांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी सहकारातील ज्येष्ठनेते शिवाजीराव नलावडे, संजीव कुसाळकर, संचालक नंदकुमार काटकर, प्रकाश दरेकर, नितीन बनकर, रामदास मोरे, अरुण पानसरे, गुलाबराव मगर, विष्णू घुमरे, अनिल गजरे, जयश्री पांचाळ यांसह सहकारातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*फोटो ओळ*
भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. मात्र दुसरा कुणाचाच अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर ढोल ताशाच्या गजरात त्यांनी अध्यक्ष पदाचा कारभार हाती घेतला. यावेळी आमदार दरेकर यांनी उपस्थितांसमोर आपले मनोगत व्यक्त केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant