Breaking News
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयकडून कायम
नवी दिल्ली - परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी दोषी असलेले पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत दिली आहे. हा राज्य सरकारसाठी धक्का मानला जात आहे.
परभणीत सहा महिन्यांपूर्वी संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर मोठा हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात पोलिसांच्या लाठीमारात आणि त्यानंतर कोठडीत पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे. महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
सोमनाथ यांचा मृत्यू कोठडीत, राज्य सरकारच्या अखत्यारीत असताना झाला. आम्ही न्यायालयाला ही बाब लक्षात आणून दिली. न्यायालयाने एका आठवड्यात एफआयआर दाखल करा, असे सांगितले होते. पण तो अद्याप दाखल केला नाही. आता न्यायालयाचा अवमान केला आहे हे सिद्ध झाले आहे, असे आंबेडकर म्हणाले. या खटल्यात राज्य सरकार आरोपी आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू राज्य सरकारच्या ताब्यात असताना झाला आहे. मात्र, सरकारने हात झटकण्याचे काम केले. आम्ही हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant