Breaking News
मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे ‘राजा छत्रपती समस्या समाधान शिबिर’
मुंबई - राज्य सरकारने थेट जनतेच्या दारी पोहोचावे यासाठी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी वरळी येथे ‘राजा छत्रपती समस्या समाधान शिबिर’ आयोजित केले होते. परळ व भायखळानंतर वरळीमध्ये आयोजित केलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण मुंबईमध्ये सदर शिबिरे टप्प्याटप्प्याने राबवली जात आहेत.
आज वरळी येथील शिबिरात एकूण ३२२ तक्रारी प्राप्त झाल्या, त्यात पाणीपुरवठा, गटारसफाई, पुनर्विकासातील अडचणी, स्वच्छता, शासकीय दाखले, रेशन कार्ड, स्थानिक पायाभूत सुविधा अशा मूलभूत विषयांचा समावेश होता.
शिबिरासाठी निश्चित केलेला वेळ संपल्यानंतरही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे लक्षात घेऊन मंत्री लोढा यांनी शिबिराला २ तास अधिक वेळ दिला आणि प्रत्येक तक्रारीवर प्रत्यक्ष संवाद साधून त्याचे निराकरण सुनिश्चित केले. एकाही नागरिकाची तक्रार प्रलंबित राहू नये, हे त्यांनी स्वतः पाहिले.
या यशस्वी शिबिरानंतर मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “येथे येणाऱ्या तक्रारी म्हणजे जनतेचा सरकारवर असलेला विश्वास आहे. नागरिकांना वारंवार कार्यालयांच्या फेऱ्या न मारता, एका ठिकाणी त्यांच्या समस्या ऐकून घेणं आणि त्या सोडवणं, हाच खरा लोकाभिमुख प्रशासनाचा हेतू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर समस्या समाधान शिबिरे संपूर्ण मुंबईमध्ये राबवत आहोत. माझ्यासाठी ही केवळ सेवा नव्हे, तर लोकांच्या अडचणी समजून घेण्याची जबाबदारी आहे.”
या शिबिरात महापालिका व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व तक्रारी नोंदवून, त्यावर तातडीने कार्यवाहीचे आदेश देण्यात आले. ‘राजा छत्रपती समस्या समाधान शिबिर’ पुढील दिवसांत मुंबईतील अन्य विभागांमध्येही राबवण्यात येणार असून, अधिकाधिक नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant