Breaking News
मिग-२१ लढाऊ विमान होणार सेवानिवृत्त
मुंबई - नवी दिल्ली, दि. २२ : भारतीय हवाई दलातील सर्वात जुने आणि अत्यंत महत्त्वाचे लढाऊ विमान मिग-21 अखेर निवृत्त होणार आहे. १९ सप्टेंबर रोजी चंदीगडमधील हवाई तळावर एक औपचारिक समारंभ आयोजित केला जाणार असून त्यातून एका युगाचा अंत होणार आहे. मिग-21 हे विमान 1963 मध्ये भारतीय हवाई दलात दाखल झाले होते आणि ते भारताचे पहिले अल्ट्रा-सोनिक लढाऊ विमान होते. त्याच्या आगमनाने भारताला शत्रूपक्षावर वर्चस्व मिळवण्याची नवी क्षमता प्राप्त झाली होती. 1965 आणि 1971 मधील भारत-पाक युद्धांमध्ये तसेच कारगिल संघर्ष आणि बालाकोट एअर स्ट्राइक यामध्ये मिग-21ने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
मात्र या विमानाचा प्रवास कायमच गौरवाने भरलेला नव्हता. अनेक अपघात आणि पायलट मृत्यूंच्या घटनांमुळे याला “उडती शवपेटी” असे नाव मिळाले. आजवर 400 पेक्षा जास्त अपघातांमध्ये सुमारे 200 पेक्षा अधिक पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची नोंद आहे. अशा घटनांमुळे विमानाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आल्या होत्या. आता मिग-21च्या निवृत्तीनंतर भारतीय हवाई दलातील लढाऊ पथकांची संख्या 29 वर येणार आहे, जी 1960 च्या दशकानंतरची सर्वात कमी संख्या आहे.
या रिक्ततेच्या भरपाईसाठी, सरकारने स्वदेशी बनावटीचे तेजस Mark-1A लढाऊ विमान हवाई दलात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले विमान भारताच्या वायुदलाला नवसंजीवनी देईल, अशी अपेक्षा आहे. मिग-21ची निवृत्ती ही केवळ एका विमानाची नाही, तर एका विचारधारेची, एका परंपरेची आणि असंख्य पायलट्सच्या जीवनाचा भाग असलेल्या एका इतिहासाची निवृत्ती आहे. यामागे संघर्ष, पराक्रम, अभिमान आणि काहीशा वेदनादायक आठवणींची एक अखंड शृंखला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर