Breaking News
ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा ९४९ कोटींचा प्रस्ताव प्रलंबित
ठाणे – अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा ९४९ कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठविला असून तो अद्याप प्रलंबित आहे. तसेच ठाणे स्थानकावर मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल तातडीने बांधण्याबाबत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज संसदेत नियम ३७७ च्या आधारे प्रश्न उपस्थित करत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले.
ठाणे लोकसभा मतदारसंघाची लोकसंख्या सुमारे २६ लाख आहे. रेल्वे हे येथील रहिवाशांसाठी वाहतुकीचे मुख्य साधन आहे. रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळण्यास विलंब झाल्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रकल्प दीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत मध्य रेल्वेने ९४९ कोटी रुपयांचा अंदाजे खर्चाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे, जो अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
ठाणे हे देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे आणि त्याचे आधुनिकीकरण करण्याची नितांत आवश्यकता आहे. ठाणे स्थानकावर मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल तातडीने बांधण्याची आवश्यकता आहे. हा पूल प्लॅटफॉर्म क्रमांक १ ला प्लॅटफॉर्म क्रमांक ७ आणि ८ शी जोडेल, तसेच स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंना जोडेल, ज्यामुळे प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यात आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मोठी मदत होईल. तरी रेल्वे मंत्र्यांनी या दोन्ही सार्वजनिक महत्त्वाच्या प्रस्तावांकडे वैयक्तिक लक्ष द्यावे आणि रेल्वे बोर्डाला लवकरात लवकर ते मंजूर करण्याचे निर्देश द्यावेत, जेणेकरून ठाण्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल आणि त्यांचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होईल, अशी विनंती खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade