Breaking News
जपानमध्ये तांदळाचा मोठा तुटवडा
देश विदेश
टोकीयो -जपानमधील सरकारने भूकंप आणि वादळाच्या धोक्याबाबत इशारा दिल्यामुळे लोकांनी घाबरून तांदूळ खरेदी करून घरात साठवून ठेवण्यास सुरुवात केली असून त्यामुळे बाजारात तांदळाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून जपानमधील अनेक सुपरमार्केटमध्ये तांदूळ संपला आहे. जून 1999 नंतर पहिल्यांदाच जपानमध्ये तांदळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. जपान टाइम्सच्या मते, ज्या सुपरमार्केटमध्ये तांदूळ उपलब्ध आहे, तेथे लोकांना कमी प्रमाणात तांदूळ खरेदी करण्याचे आवाहन केले जात आहे. 13 ऑगस्टपासून जपानमध्ये ओबोन महोत्सव सुरू होत आहे. ओबोन उत्सवादरम्यान लोक त्यांच्या पूर्वजांना आदरांजली वाहतात. त्यांच्या स्मरणार्थ उत्सव साजरे केले जातात. या सणानिमित्त लोक दीर्घ सुट्टीवर आहेत. त्यामुळे तांदळाची मागणी वाढली आहे.
तांदळाच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर जपान सरकारने मंगळवारी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. कृषी मंत्री तेताशी साकामोटो म्हणाले की, देशात काही ठिकाणी तांदळाच्या साठ्याची कमतरता आहे, परंतु आम्ही लवकरच त्यावर मात करू. सध्या तांदळाचा पुरेसा साठा आहे. भाताचे पीक वर्षातून एकदाच घेतले जाते. नवीन भाताची काढणी सप्टेंबरमध्ये सुरू होईल, त्यानंतर बाजारात नवीन पीक आल्याने परिस्थिती सुधारेल.
अनेक बेटांच्या समूहावर वसलेल्या जपानमध्ये मे ते नोव्हेंबर या महिन्यांला टायफून सीझन म्हणतात. या काळात सुमारे 20 वादळे येतात. यामुळे अतिवृष्टी, भूस्खलन आणि पूर येतो. वादळाच्या हंगामातही ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक वादळे येतात. यावर्षी 19 ते 21 वादळ येण्याची शक्यता आहे. जपान सरकारने या वादळांचा इशारा दिला होता, त्यानंतर लोक घाबरून घरांमध्ये तांदूळ साठवून ठेवत आहेत.
यासोबतच यंदा जपानमध्ये विक्रमी संख्येने विदेशी पर्यटक आले आहेत. त्यामुळे भाताचीही टंचाई निर्माण झाली आहे. जपान नॅशनल टुरिझम ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार या वर्षी जूनपर्यंत 31 लाखांहून अधिक परदेशी पर्यटक जपानमध्ये आले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर