Breaking News
मुंबईत ‘मंकीपॉक्स’ साठी विशेष कक्ष
मुंबई - जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने या रोगावर देखरेख आणि व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी आहे. मुंबई शहरात ‘मंकीपॉक्स’ आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही तरीही सरकारच्या निर्देशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सेव्हन हिल्स रुग्णालयात मंकीपॉक्स रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या विशेष कक्षात १४ खाटांची सोय करण्यात आली आहे.
पाकिस्तान आणि स्विडन या देशांत मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.मुंबई शहरात परदेशातून येणार्या नागरिकांची संख्या लक्षात घेता अधिक सावधगिरी बाळगली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सेव्हन हिल्स रुग्णालयात ‘मंकीपॉक्स’ रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याठिकाणी सध्या तरी १४ खाटांची सोय केली आहे. गरजेनुसार त्यात वाढ केली जाणार आहे. त्याचप्रमाणे यासंदर्भात मुंबई विमानतळ आरोग्य अधिकारी,इमिग्रेशन अधिकारी आणि कार्यकारी आरोग्य अधिकारी यांची एकत्रित समन्वय बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर विशेषतः आफ्रिकन देशातून येणार्या प्रवाशांची आणि इतर प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे.
नागपूर येथील मेयो रूग्णालयात या आजाराच्या रुग्णांसाठी खाटा आरक्षित ठेवण्यात येणार आहे. तसेच नागपूर विमानतळावरही संशयितांची चाचणी करण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने मेडिकल-मेयोला तसे पत्र देत आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.
दरम्यान कोरोना लस कोविशील्ड बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने मंकीपॉक्स (Mpox) लस तयार करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सीईओ अदर पूनावाला म्हणाले- Mpox ला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर, आम्ही लाखो लोकांना मदत करण्यासाठी एक लस विकसित करत आहोत. आशा आहे की आम्ही ती एका वर्षात पूर्ण करू.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade