Breaking News
अहमदनगर आकाशवाणीचे सायंकालीन प्रसारण पुन्हा सुरू
अहमदनगर - गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे सायंकालीन प्रसारण 15 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. आकाशवाणी महानिर्देशनालय दिल्ली आणि अपर महानिर्देशनालय मुंबई यांनी नुकतीच यासाठी परवानगी दिल्याची माहिती आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रम विभागप्रमुख राजेन्द्र दासरी यांनी दिली आहे.
आकाशवाणी अहमदनगर केंद्राची स्थापना 14 एप्रिल 1991 मध्ये झाली असून, तेव्हापासून विविध कार्यक्रमांद्वारे या केंद्राने श्रोत्यांचे मनोरंजन केले आहे. श्रोत्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या या केंद्राचे सायंकालीन प्रसारण बंद झाल्यामुळे स्थानिक कलाकार आणि श्रोते नाराज होते. तसेच सायंकालीन प्रसारणात स्थानिक कार्यक्रमाऐवजी मुंबई विविधभारतीचे कार्यक्रम सहक्षेपित होत होते. त्यामुळे स्थानिक कलाकार, विचारवंत, तसेच आकाशवाणीचे नैमित्तिक उद्घोषक यांना मिळणार्या संधी कमी झाल्या होत्या. आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रम विभागप्रमुख राजेन्द्र दासरी यांनी वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे सायंकालीन प्रसारणास मंजूरी मिळाली असून 15 ऑगस्ट 2024 पासून पूर्वीप्रमाणेच प्रसारण पुन्हा सुरू होणार आहे.
त्यामुळे आता अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील श्रोत्यांना लोकसंगीत, नारीशक्ती, चला करूया पर्यटन, कौटुंबिक श्रुतिका-विचारमंथन, लोकजागर, व्यक्तीवेध, आपली आवड आपकी पसंद, ओळख कायद्याची, हॅलो गीतबहार, सुहाना सफर, रजनीगंधा, हॅलो डॉक्टर, युवावाणी, किसानवाणी, आमचं शेत आमचा परिसर, शास्त्रीय संगीत इत्यादी लोकप्रिय कार्यक्रमांची मेजवाणी श्रोत्यांना मिळणार आहे.
आकाशवाणी अहमदनगर केंद्राच्या वतीने सायंकालीन स्थानिक प्रसारण सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आला होता. त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर यश मिळालं असून, 15 ऑगस्ट 2024 पासून आकाशवाणी अहमदनगर केंद्रावरील सायंकालीन स्थानिक प्रसारण पुन्हा सुरू होणार आहे, यामुळे स्थानिक कलाकारांना संधी मिळण्यास मदत होणार असल्याची माहितीही विभागप्रमुख राजेन्द्र दासरी यांनी यावेळी दिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant