Breaking News
अमेरिकेत हायड्रोजनवर आधारित ‘हवाई टॅक्सी’ची चाचणी यशस्वी
न्यूयॉर्क - हवाई टॅक्सी येत्या काळातील रस्त्यांवरील प्रचंड गर्दीवर एक उपाय म्हणून पाहीले जात आहे. ही सेवा प्रत्यक्षात येण्यासाठी जगभरात वेगवेगळे प्रयोग सुरु असून असाच एक प्रयोग अमेरिकेत यशस्वी झाला आहे. प्रायोगिक स्तरावर असणारी ‘फ्लाईंग एअर टॅक्सी’ अर्थात ‘उडणारी हवाई टॅक्सी ‘आता लवकरच प्रत्यक्षात सेवेत रुजू होईल,असे संकेत मिळाले आहेत.या टॅक्सीच्या उड्डाणाची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. हायड्रोजनवर चालणार्या या एअर टॅक्सीने चाचणीदरम्यान ९०२ किलोमीटर्सचे विक्रमी अंतर यशस्वीरीत्या पार करून लँडिंग केले.
लँडिंग केल्यानंतर या एअर टॅक्सीत १० टक्के हायड्रोजन इंधन शिल्लक होते. त्यामुळे ही एअर टॅक्सी याहून अधिक अंतरही कापू शकते, हे स्पष्ट झाले आहे.जॉबीजने तयार केलेली ही पहिलीच हायड्रोजन इलेक्ट्रिक एअरक्राफ्ट टॅक्सी असून ती व्हर्टिकली उड्डाण करू शकते आणि जमिनीवर उतरूही शकते.टॅक्सीने हवाई प्रवास हा मानवी विकासाचा पुढील टप्पा असून यावर आणखी संशोधन सुरू आहे, असे जॉबीचे संस्थापक व प्रमुख जोएबेन बेव्हिर्ट यांनी यावेळी स्पष्ट केले.गेल्यावर्षी पूर्णपणे इलेक्ट्रिकवरील एअर टॅक्सीची छोट्या ट्रिपमध्ये चाचणी घेण्यात आली होती. ती यशस्वी झाल्यानंतर हायड्रोजन-इलेक्ट्रिक व्हर्जनकडे लक्ष केंद्रित करण्यात आले.
एअर टॅक्सीमुळे मॅनहॅटन ते जेएफके हा प्रवास अवघ्या सात मिनिटांत होऊ शकतो.सध्या हा रस्ता मार्गाने कार प्रवासासाठी एक तासाचा अवधी लागतो.सॅन फ्रॅन्सिस्को ते सॅन दिएगो, बोस्टन ते बॅल्टिमोर, नॅश्विल्ले ते न्यू ऑर्लियन्स या मार्गावर सध्या हवाई टॅक्सीची सेवा सुरू केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. यात नव्या द्रवरूप हायड्रोजन इंधन टाकीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यात ४० किलो द्रवरूप हायड्रोजन साठवले जाऊ शकते.एक चालक व चार प्रवासी या हवाई टॅक्सीतून आरामशीर प्रवास करू शकतील.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade