Breaking News
पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या आधी फ्रान्समधील रेल्वे नेटवर्कवर हल्ला
पॅरिस - आजपासून फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होत आहे.ऑलिम्पिक ओपनिंग सेरेमनीच्या काहीतास आधी फ्रान्समध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. पॅरिसमधील हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आलं आहे. रेल्वे मार्गावर जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारामुळे ट्रान्सपोर्ट सिस्टिमवर परिणाम झाला आहे. फ्रान्सची ट्रेन ऑपरेटर कंपनी एसएनसीएफने शुक्रवारी न्यूज एजन्सी AFP ला या संपूर्ण घटनेची माहिती दिली. फ्रान्सच्या हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कवर हल्ला करुन जाळपोळ करण्यात आली असं एसएनसीएफकडून सांगण्यात आलं.
अनेक रेल्वे मार्गांवर जाळपोळ झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार, पॅरिसला जाणाऱ्या आणि येणाऱ्या अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक गाड्या 90 मिनिटे उशिराने धावत आहेत. युरोस्टार कंपनीने सांगितले की त्यांनी अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. या हल्ल्यामुळे लंडन ते पॅरिस रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या गाड्या वळवण्यात आल्या आहेत. फ्रान्सची सरकारी रेल्वे कंपनी SNCF ने सर्व प्रवाशांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्यांना स्टेशनवर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
एसएनसीएफने सांगितले की, हल्ल्यामुळे सुमारे 8 लाख प्रवासी प्रभावित झाले आहेत. रेल्वे व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी शेकडो कर्मचारी तैनात केले आहेत. फ्रान्सचे वाहतूक मंत्री पॅट्रिस व्हर्जराइट यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे हल्ल्याचा निषेध केला आहे. एसएनसीएफच्या सतत संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यूयॉर्क टाईम्सच्या मते, फ्रान्समधील तीन हाय-स्पीड ट्रेन मार्गांवर सेवा बंद करण्यात आली आहे. यामध्ये अटलांटिक, उत्तर आणि पूर्व लाइन समाविष्ट आहेत. पॅरिसपासून सुमारे 160 किमी अंतरावर असलेल्या अरास शहरात हा हल्ला झाला. यानंतर, कोर्टलेन शहरातील टूर्स आणि ले मॅन्स लाइनवर दुसरा हल्ला झाला. हे शहर पॅरिसपासून 144 किमी अंतरावर आहे.
एसएनसीएफ प्रमुख म्हणाले की, रात्री आमचे रेल्वे नेटवर्क आणि वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पॅरिसच्या पश्चिम, उत्तर आणि पूर्वेला चालणाऱ्या TGV लाईन्सवर तीन आगी लागल्या आहेत. ल्योन आणि दक्षिणेकडे भूमध्य समुद्राकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर जाळपोळ करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.
पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान होणार आहे. आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला सुमारे 3 लाख प्रेक्षक आणि 10 हजार 500 खेळाडू उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळा सीन नदीवर ओपन-एअर समारंभात होईल. त्याच्या सुरक्षेसाठी 45 हजार सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेच्या सुरक्षेसाठी पॅरिसमध्ये 35 हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर