Breaking News
आता निश्चिंतपणे करा ‘समृद्धी’ मार्गावर प्रवास; अपघाताच्या भीतीला विराम, कारण…
विदर्भासाठी वरदान ठरलेला समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या कमी झाली असली, तरी ते पूर्णपणे संपुष्टात आलेली नाही. त्यामुळे या मार्गावर प्रवास करताना अजूनही काळजी घ्यावी लागते. अपघातामागची कारणे वेगवेगळी असून त्यावर उपाययोजना आणि जनजागृती करण्यात आलेली आहे. परिणामी अपघातांचे प्रमाण घटले असले तरी ते अजूनही पूर्ण थांबलेले नाही.
समृद्धी महामार्गावर काही ठिकाणी मोठ्या आकाराचे फलक (होर्डिंग्स) लावण्यात आले आहेत. तसेच रस्त्याच्या मधोमध काही आकर्षक वस्तूही बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांचे लक्ष वेगवेगळ्या दिशांनी वळते आणि दीर्घकाळ एकसंध रस्ता पाहून निर्माण होणाऱ्या संमोहनाची स्थिती टाळली जाते. समृद्धी मार्गावरील अपघातांचे दोन प्रमुख कारणे समोर आली होती. दीर्घ अंतर सलग चालवल्याने चालकाला येणारी एकाग्रतेची झोपट तसेच सिमेंटच्या रस्त्यावर वाहनांच्या टायरवर उष्णतेचा होणारा परिणाम. आता चालक काही वेळ चालवल्यानंतर मध्येच थांबतो, इंधन भरतो, चहा घेतो त्यामुळे एकसंध झापड जाणवत नाही आणि संमोहन टाळले जाते.
त्याशिवाय काही वेळ थांबल्यामुळे वाहनांच्या चाकांचे तापमानही कमी होते. दिवसा समृद्धी महामार्गावर प्रवास केल्यास अपघातांचे प्रमाण तुलनेत घटताना दिसते. मात्र, रात्री प्रवास करताना काही ठिकाणी जवळपास 75 ते 100 किलोमीटर अंतरावर रस्त्यावर पुरेशी विद्युत व्यवस्था नसल्यामुळे अंधाराचे वातावरण असते. अशावेळी वाहनचालक फक्त गाडीच्या हेडलाइटच्या आधारे रस्ता पाहत असतो. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध लावलेली आकर्षक सजावट किंवा बाजूचे मोठे फलक (होर्डिंग्स) अंधारात सहज दिसत नाहीत, ते अचानक जवळ आल्यावर दिसतात. परिणामी चालक घाबरतो किंवा गोंधळतो. त्यामुळे संमोहनाची अवस्था अधिक तीव्र होते आणि झोप येण्याची शक्यता वाढते. याच कारणामुळे अपघाताच्या घटना घडतात.
त्यामुळे रात्रीच्या वेळी समृद्धी महामार्गावरील संमोहन टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हीच बाब लक्षात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. संजय जानराव ढोबळे यांनी एम.एस्सी. (भौतिकशास्त्र) शाखेतील विद्यार्थिनी खुशबू सिंग आणि एमबीएच्या विद्यार्थिनी नमीका शेख यांच्या सहकार्याने एक नावीन्यपूर्ण संकल्पना साकारली आहे. त्यांनी तयार केलेल्या या कल्पनेला ‘लूम अलर्ट’ असे नाव देण्यात आले आहे. या मॉडेलनुसार, प्रत्येक पेट्रोल पंपानंतर सुमारे 50 किलोमीटरच्या अंतरावर एक आकर्षक प्रवेशद्वार उभारण्याची योजना आहे. या गेटवर एकीकडे मोराची आकृती असलेली एलईडी लाइट तर दुसरीकडे एलईडी दिव्यांचा गुच्छ लावण्यात येणार आहे. याशिवाय गेटखाली प्लास्टिक संरचनेत एलईडी दिव्यांची मांडणी करून संपूर्ण गेट प्रकाशाने उजळून निघेल, अशी रचना सुचवण्यात आली आहे.
फक्त एवढंच नाही, तर या प्रकाशद्वाराच्या काही अंतर आधी म्हणजे दर 10 मीटरवर लाल, निळ्या आणि हिरव्या रंगांच्या एलईडी झाडांची रांग रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभारण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकाशयुक्त संकल्पनेला ‘लूम अलर्ट’ असं नाव देण्यात आलं आहे. जेव्हा एखादा वाहनचालक लांबून या भागात प्रवेश करेल, तेव्हा त्याचे लक्ष या झगमगाटाकडे वेधले जाईल. तो जेव्हा या चमकत्या गेटमधून प्रवास करेल, त्याच वेळी समोरून येणाऱ्या वाहनांसाठीही अशाच स्वरूपाचे प्रकाशद्वार असेल. त्यामुळे जवळपास दोन ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनचालक उजळलेल्या मार्गातून जाईल आणि त्यामुळे झोप येण्याची शक्यता कमी होईल.
ही संकल्पना प्रत्येक 100 किलोमीटर अंतरावर दोन्ही दिशांनी लागू करावी, अशी जोरदार शिफारस प्रा. डॉ. संजय ढोबळे आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या विद्यार्थिनी खुशबू सिंग व नमीका शेख यांनी केली आहे. त्यांच्या मते, रात्रीच्या वेळी दीर्घ काळ अंधारात वाहन चालवल्यानंतर होणाऱ्या संमोहनाची समस्या या योजनेमुळे दूर होईल आणि अपघातांचे प्रमाण निश्चितच घटेल, असा त्यांचा विश्वास आहे.
अलीकडेच रात्री सुमारास, साडेसातच्या दरम्यान घडलेल्या एका भीषण अपघातात, वाहनचालकाला झोपेची झटका आल्यामुळे उमरेड येथे एका कुटुंबातील चार सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर अपघातामागची कारणमीमांसा करत असताना, डॉ. संजय जानराव ढोबळे यांच्या मनात ‘लूम अलर्ट’ या नावीन्यपूर्ण संकल्पनेचा विचार आला. त्यानंतर त्यांनी आपल्या संशोधन पथकातील विद्यार्थिनी खुशबू सिंग आणि नमीका शेख यांच्या सहकार्याने या योजनेचे मॉडेल तयार केले. विशेष म्हणजे, या अभिनव संकल्पनेसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पेटंटही प्राप्त झाले आहे.
डॉ. संजय ढोबळे हे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची जाणीव आणि समाजोपयोगी विचारांची रुजवण घडवत आहेत. त्यांच्या मते, विद्यापीठांमध्ये केवळ शिक्षण न देता, समाजासाठी उपयुक्त ठरणारे संशोधन करणे हीदेखील एक महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यांनी याच उद्देशाने ‘लूम अलर्ट’सारख्या प्रकल्पातून सामाजिक हित साधण्याचा प्रयत्न केला आहे.
या उपयुक्त संशोधनासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या पेटंटसाठी डॉ. ढोबळे, तसेच त्यांच्या सहकारी संशोधक खुशबू सिंग आणि नमीका शेख यांचे कौतुक करण्यात आले आहे. प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे), प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त आणि लेखा अधिकारी हरीश पालीवाल, भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश चिमणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संशोधक टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर