Breaking News
विधिमंडळात आता आमदारांसाठी नीतिमूल्ये समिती….
मुंबई — विधिमंडळात काल झालेल्या हाणामारीच्या प्रकरणामुळे विधिमंडळाची मोठी बदनामी झाली आहे, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता संसदेतील नीतिमूल्य समितीच्या धर्तीवर इथेही अशी समिती विधानपरिषद सभापतींशी चर्चा करून निर्माण केली जाईल अशी घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. यासोबतच पुढील अधिवेशनापासून केवळ विधीमंडळ सदस्य ,त्यांचे स्वीय सहाय्यक आणि शासकीय अधिकारी यांनाच विधीमंडळ परिसरात प्रवेश देण्यात येईल , कोणत्याही इतर व्यक्तींना प्रवेश बंद केला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
काल घडलेल्या घटनेतील एक व्यक्ती जितेंद्र आव्हाड आणि दुसरा गोपीचंद पडळकर यांच्या सोबत प्रवेशपत्रिका नसतानाही बेकायदेशीरपणे विधीमंडळ परिसरात आले, त्यामुळे या दोन्ही सदस्यांनी सभागृहाची दिलगीरी व्यक्त करण्याची सूचना अध्यक्षांनी यावेळी केली, त्यावर या दोघांनी दिलगिरी व्यक्त केली.
हाणामारी करणाऱ्यांमध्ये एक आव्हाड यांच्या सोबत तर इतर सहा ते सात पडळकर यांच्या सोबत आले होते, त्या सगळ्यांवर विविध कलमातर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यांच्यावर विशेषाधिकार भंगाची कारवाई देखील करण्यात येईल, सदस्यांनी सोबत आणलेल्या व्यक्तींची सर्व जबाबदारी सदस्यांनीच घ्यायची आहे असं मत अध्यक्षांनी यावेळी सांगितलं.
अशा घटनांमुळे जनमानसात विधिमंडळाची प्रतिमा मलिन झाली आहे असं अध्यक्ष म्हणाले, यावर बोलताना आपण कोणालाही सोबत आणले नव्हते ,या घटनेशी माझा प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष संबंध नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले मात्र विषयाचे गांभीर्य बाळगा, आपल्या बद्दल बाहेर जनता काय बोलते आहे ते बघा, लोकभावना लक्षात घ्या ,राजकारण करू नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सुनावलं.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर