Breaking News
मिरा-भाईंदरमध्ये ड्रग्स तस्करी प्रकरणावर मोका अंतर्गत कठोर कारवाईचे आदेश…
मिरा-भाईंदर -मिरा-भाईंदर शहरातील हटकेश परिसरात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स तस्करी आणि त्याचा थेट परिणाम तरुण पिढीवर होत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस येत होते. या पार्श्वभूमीवर आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हटकेश परिसराला भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले.
सदर प्रकरणात, काही दिवसांपूर्वी हटकेश भागातील ‘माफिया’ नावाच्या क्लबजवळ ड्रग्स तस्करी करणाऱ्या आरोपींना काशीगाव पोलिसांनी अटक केली होती. मात्र, केवळ दोन तासांतच कोणतीही ठोस कारवाई न करता या आरोपींना सोडून दिल्याचे समोर आले. एका वृत्तवाहिनीच्या माध्यमातून ही माहिती मिळताच मंत्री सरनाईक यांनी तातडीने एक्शन मोडमध्ये जाऊन कठोर पावले उचलली.
या प्रकरणावर बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले,
“मिरा-भाईंदर हे शांतताप्रिय आणि झपाट्याने विकसित होणारे शहर आहे. अशा शहरात जर अशा प्रकारे खुलेआम ड्रग्सची विक्री व सेवन होत असेल, तर हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. या शहराच्या प्रतिमेला कलंक लागणाऱ्या अशा घटनांवर तात्काळ आणि कठोर कारवाई केली पाहिजे. या प्रकरणात संबंधित आरोपींवर ‘मोका’ (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.
त्याचसोबत यासंदर्भात काशिगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांमार्फत ड्रग्स माफियांना मदत केल्याप्रकरणी नवनिर्वाचित पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना संपर्क साधून या प्रकरणी तातडीने चौकशी करून ड्रग्स माफियांना अटक करावी आणि या संदर्भात ज्या पोलिसांकडून ड्रग्स माफियांना मदत करण्यात आली आहे त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. असे आदेश मंत्री सरनाईक यांच्या मार्फत देण्यात आले.
या संदर्भात पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्याशी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले कि,
“कालच तुम्ही पोलीस आयुक्त या पदाचा चार्ज घेतला आहे, परंतु तुमच्या कारकिर्दीत या शहरातून ड्रग माफिया आणि ड्रग्सचे रॅकेट पूर्णपणे उध्वस्थ करण्याची मोहीम तत्काळ राबवावी. जेणेकरून मिरा-भाईंदरमधील तरुण पिढी बरबाद करणाऱ्यांना अद्दल शिकवली जाईल आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल.”
मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, “तरुण पिढी ही आपल्या देशाचा आधार आहे. त्यांना ड्रग्सच्या आहारी नेणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांना कोणतीही माफक वागणूक दिली जाणार नाही. मिरा-भाईंदरमध्ये अशा प्रकारांना मुळासकट नष्ट करण्यासाठी ‘ड्रग्स मुक्त शहर मोहीम’ राबण्यात येईल. हे शहर घडवण्यासाठी आपण आहोत, बिघडवण्यासाठी नव्हे. शहराच्या विकासाला अडथळा ठरणाऱ्या, तरुण पिढीच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणत्याही शक्तींना मिरा-भाईंदरमध्ये थारा नाही. इथं कायद्याचं राज्य आहे, आणि ते अबाधित ठेवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.”
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant