Breaking News
ठाणे- भिवंडी-कल्याण भूमिगत मेट्रो उल्हासनगर - अंबरनाथपर्यंत धावणार
मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो 5 चा विस्तार करण्यात येणार आहे. हा विस्तार उल्हासनगर आणि अंबरनाथपर्यंत केला जाणार आहे. ठाणे-कल्याण- भिवंडी मेट्रो मार्ग क्रमांक 5 च्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली.
भिवंडी शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या परिवहन सेवेच्या गरजा भागविण्यासाठी कल्याण – भिवंडी मेट्रो लाईन प्रकल्प राबविण्यात येत आहे. भिवंडी शहरात वाढती लोकसंख्या, मालवाहतूकदारांची मोठी संख्या यामुळे कायमच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याकरीता आणि शहराच्या सर्वांगीण, वेगवान पायाभूत विकासासाठी भूमिगत मेट्रोसह रस्ता रूंदीकरण आणि नवीन उड्डाणपूल निर्मितीचा स्वतंत्र प्रकल्प राबविण्याचा निर्णय ठाणे-कल्याण- भिवंडी मेट्रो मार्ग क्रमांक 5 च्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (MMRDA) राबविण्यात येत असलेल्या मेट्रो लाईन-5 या प्रकल्पांच्या माध्यमातून ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर परिसरातील लाखो नागरिकांना जलद, सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे. विकसनशील शहरे आणि औद्योगिक केंद्रे यांच्यासाठी सार्वजनिक वाहतूक आणि रस्ते ही दोन्ही माध्यमे परस्परपूरक असून त्यांची अंमलबजावणी समांतर पद्धतीने केल्यास विकासाची गती वाढेल. नागरिकांना अधिक फायदेशीर सेवा मिळू शकणार आहे.
उल्हासनगर आणि अंबरनाथपर्यंत मेट्रोचा विस्तार
या प्रकल्पांमुळे भिवंडी शहरातील दळणावळणाला गती येणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या भागातील औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचा विस्तार आता कल्याणच्या पुढे उल्हासनगरपर्यंत होत आहे. उल्हासनगरच्यापुढे अंबरनाथ जवळील चिखलोली उपनगरीय रेल्वे स्थानकापर्यंत विस्तार करण्याबाबत अभ्यास करण्यात येत आहे. यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड आणि आजूबाजूच्या परिसरातील लाखो रहिवाशांना मुंबई आणि ठाणे या प्रमुख शहरी केंद्रांपर्यंतचा प्रवास अधिक जलद होणार आहे.
पायाभूत सोयी सुविधांच्या प्रकल्पांमुळे भिवंडी शहराच्या विकासाला गती मिळणार असून या प्रकल्पांसाठी शासन निधी उपलब्ध करून देईल. भिवंडी शहरात मेट्रोच्या कामासोबतच रस्ता रूंदीकरण प्रकल्पाचे कामही सुरू करण्यात यावे. भिवंडी शहरातील नागरिकांची या प्रकल्पांच्या पूर्णत्वानंतर वाहतूक कोंडीच्या समस्येतून कायमस्वरूपी सुटका होणार आहे, भिवंडीवासियांसाठी मेट्रो प्रमाणेच रस्ता रुंदीकरण प्रकल्पही महत्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही प्रकल्पांचे काम सोबतच सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. रस्ता रूंदीकरण प्रकल्प राबविल्यामुळे भिवंडी शहरातील उत्तर भागाचा सर्वांगीण विकास होणार असून या भागातील नागरिकांचे दळण वळण गतीमान होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई महानगर प्रदेशमध्ये भिवंडी हे मालवाहतूकीचे विकासकेंद्र होत आहे. या शहराच्या विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. शहरातील पायाभूत सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. शहरातील मेट्रो मार्गाच्या कामाबाबत आलेल्या लोकप्रतिनिधींच्या सूचनांचाही अंतर्भाव करण्यात यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या. मेट्रोचे काम करताना ‘डिप टनेल’ तंत्रज्ञान वापरून बोगदा तयार करण्याच्या कामाची पडताळणी करावी. तसेच दुहेरी बोगदा तंत्रज्ञान वापरून रस्ता आणि मेट्रो मार्ग तयार करण्याच्या कामाचाही अभ्यास करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग क्रमांक 5 ठळक वैशिष्ट्ये
प्रकल्पाची अंदाजित किंमत
मेट्रो मार्ग 5 : 8417 कोटी आणि मेट्रो मार्ग 5 अ: 4063 कोटी
कामांची सद्यस्थिती व प्रकल्पातील टप्पे
टप्पा-I (कापूरबावडी – धामणकर नाका) साठी 96% काम पूर्ण झाले आहे.
प्रकल्पाचे टप्पे
मेट्रो मार्ग - 5 टप्पा 2 (धामणकर नाका – दुर्गाडी):
लांबी: अंदाजे 10.50 किमी.
या टप्प्यात 6 स्थानके असून त्यात 1 भूमिगत आणि 5 उन्नत स्थानके आहेत.
सदर टप्प्यातील मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम करण्यात येत असून भूमी अधिग्रहण करण्यात येईल.
मेट्रो मार्ग 5अ (दुर्गाडी ते कल्याण आणि उल्हासनगर जोडणी)
लांबी: 11.83 किमी. : यात दुर्गाडी ते कल्याण (6.557 किमी, 4 स्थानके) आणि उल्हासनगर जोडणी (5.272 किमी, 3 स्थानके) असे दोन कॉरिडॉर प्रस्तावित आहेत. या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम कार्यवाही सुरु आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar