Breaking News
मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ, 10 जुलै 2025 पर्यंत घेता येणार प्रवेश
Mumbai University Admission Process for First Year: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राबविण्यात येत असलेल्या मुंबई विद्यापीठाशी सलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी 10 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी 27 जून पर्यंत ही प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयांनी पार पडावी अश्या अनुषंगाने विद्यापीठाने परिपत्रक निर्गमित केले होते. मात्र व्यापक विद्यार्थीहित लक्षात घेऊन सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा तसेच कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी मुंबई विद्यापीठामार्फत 10 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर सामान्य गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा असून प्रवेश देऊन जागा रिक्त राहिल्यास महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर गुणवत्ता यादी जाहीर करून विद्यार्थ्यांना प्रवेशित करावे असे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. तसेच ज्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्या महाविद्यालयाचा संबंधित अभ्यासक्रमांसाठीचा ऑनलाईन अर्जही भरणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व महाराष्ट्र शासनाच्या 20 एप्रिल 2023 च्या शासन निर्णयानुसार, 3 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, 4 वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च, 5 वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी करायची आहे.
पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रीयेत खालील अभ्यासक्रमांचा समावेश
बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बीए.एमएमसी, बी.एसडब्ल्यू, बीए (फिल्म टेलेव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन), बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए (इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडीज), बीए-एमए (इंटिग्रेटेड कोर्स इन पाली) बीएमएस-एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम (अकॉउन्टींग अँड फायनान्स), बीकॉम (बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम (इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज), बीएस्सी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी (बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी (मेरिटाईम), बीएस्सी (नॉटिकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी (एरोनॉटिक्स), बीएस्सी (डेटा सायन्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बी.व्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, एफ. वाय. बी व्हॉक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट), एफवाय बी. लायब्ररी सायन्स, बी. म्युझिक, बीपीए (म्युझिक), बीपीए (डान्स) एफवाय.बीएस्सी (बायोएनॅलिटिकल सायन्स- पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) यासह अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade