Breaking News
अमित शाह यांची टीका
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आले होते. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, शरद पवार देशाच्या राजकारणातील सर्वांत जास्त भ्रष्टाचारी आहेत. ते भ्रष्टाचाराचे म्होरके आहेत. राज्यातील भ्रष्टाचाराला पवारांनी संस्थात्मक स्वरूप दिले. अमित शाहांनी टीका केल्यानंतर याचे पडसाद राज्याच्या राजकारणावर उमटले आहेत. खरे तर शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय कोणत्याही नेत्याला प्रसिद्धी मिळत नाही, असेच दिसते. शरद पवारांवर टीका करत अनेक जण राजकारणातून बाद झाले, परंतु त्यांच्यावरील टीकेचा सिलसिला बंद होत नाही. याला उत्तर म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही अमित शाह आणि भाजपावर टीका केली आहे. एवढेच नव्हे तर अमित शाहांच्या या वक्तव्यावर अजित पवार गटातील आमदारांनीही नाराजी व्यक्त करून महायुतीला घरचा आहेर दिला आहे. परंतु, याबाबत अजित पवारांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी यावर काहीही बोलायचे नाही अशा शब्दांत उत्तर देत या वादातून बाजूला गेले आहेत.
आरोप - प्रत्यारोप करणे महाराष्ट्रातील नेत्यांना नित्याचे झाले आहे. यात भाजपाचे नेते गप्प कशाला बसतील ? भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अधिवेशनात अमित शहा यांनी पवार, ठाकरे आणि राहुल गांधींचा नेहमीप्रमाणे समाचार घेतला. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत राज्यासाठी केलेल्या कामांची आणि निधीची यादी सादर करताना केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना, शरद पवार यांनी दहा वर्षांत काय केले, याचा हिशोब द्यावा, असे आव्हान अमित शाह यांनी दिले. अमित शाहांच्या या जहरी टीकेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपावर टीका केली. अजित पवार राष्ट्रवादी गटातील आमदारांनी शरद पवारांवरील टिकेबाबत नाराजी व्यक्त केली. तर अजित पवारांनी या प्रकरणावर बोलण्याचे टाळले आहे.
अजित पवारांनी या प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली नसली तरीही अजित पवार गटातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाने केलेली टीका योग्य नसल्याचे मत अजित पवारांचे कट्टर समर्थक विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. आमदार बनसोडे म्हणाले, शरद पवार हे देशाचे नेते आहेत. ते भाजपानेही कबुल केलेले आहे. भाजपाने शरद पवारांचा आदरच केला पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शरद पवार हे माझे गुरू आहेत, असे म्हटले होते. यावरून भाजपा नेते अमित शहा यांनी जे वक्तव्य केले आहे, ते योग्य नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांवर केलेला आरोप खोडसाळपणाचा आणि प्रचारकी थाटाचा वाटतो.
अमित शाहांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर यावर बच्चू कडू यांनीही प्रतिक्रिया देत म्हटले आहे, शरद पवार जर भ्रष्टाचाराचे सरदार असतील तर मग लोक विचारणार की अजित पवार कोण आहेत? सरदारांचे पुतणे आहेत की कोण आहेत? त्यामुळे अमित शाह विसरभोळे झाले असावेत. अमित शाह असे वादग्रस्त वक्तव्य करतात आणि त्यांच्या अंगलट येते.
अमित शाह यांनी आतापर्यंत बरीचशी उलट सुलट विधाने केली आहेत. विरोधकांना नामोहरम करणे तसेच त्यांची लक्तरे वेशीवर टांगणे हे अमित शाह यांना चांगले जमते. परंतु अमित शहा यांनी आपण केंद्रीय मंत्री आहोत याचे भान ठेवले पाहिजे. अन्यथा त्यांच्याबद्दल बोलताना कोणी आदर ठेवणार नाही. कारण दुसऱ्याला आदर दिला तरच आपल्याला आदर मिळतो. अमित शहा यांची पार्श्वभूमी पाहिली तर ती वादग्रस्त आहे. परंतु केंद्र सरकारमध्ये ते मंत्री झाल्यावर गुजरात व दिल्ली न्यायालयाने त्यांच्या हिताचे निर्णय घेतले असे वाटते. त्यामुळे अमित शाह आता फारसे चर्चेत नाहीत. परंतु मोठ्या पदावरील व्यक्तीने काय बोलावे, काय नाही याचे भान नेहमी ठेवले पाहिजे. सद्यस्थितीत अशा नेत्यांमुळे बाकीचे नेतेही बाष्कळ बडबड करतात असे दिसून आले आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारांना तिकीट देताना बाष्कळ बडबड करणाऱ्या नेत्यांना उमेदवारी दिली नाही. असे असताना अमित शाह नेमकी कोणती परंपरा जपत आहेत ? तसेच अशी विधाने करून त्यांच्या पक्षाला काय साध्य करायचे आहे, हेही समजत नाही. दुसऱ्यावर टीका करून कोणी स्वतः मोठे बनत नाही हे भाजपने लक्षात ठेवावे आणि मगच इतरांवर टीका करावी. शरद पवार यांच्यावर आत्ताच आरोप होत नाहीत तर गेली पंचवीस - तीस वर्षांपासून त्यांच्यावर आरोप होत आहेत. परंतु पवारांवरील आरोप कधी सिद्ध झाले नाहीत किंवा शरद पवार कोणत्याही प्रकरणात अडकले नाहीत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी असले टुकार धंदे बंद करण्याची अपेक्षा आहे. अन्यथा महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनाही तशीच सवय लागण्याचा धोका दिसतो आणि पक्षाची शिस्त बिघडू शकते. पक्षाची शिस्त बिघडली तर जनमानसात पक्षाचे महत्त्व शिल्लक राहत नाही. त्यामुळे भाजपा नेत्यांनी जपून बोलावे, असे वाटते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे