Breaking News
पावसाचा कोकण रेल्वेला फटका; मत्सगंधा, एर्नाकुलम एक्सप्रेस, तेजस, जनशताब्दी पाच तासांपासून जागेवरच उभ्या
मुंबई: रत्नागिरीतील पावसाचा (Ratnagiri Rain) कोकण रेल्वेला फटका बसला असून गेल्या चार ते पाच तासांपासून अनेक गाड्या रेल्वेस्थानकांमध्ये उभ्या आहेत. दिवणखवटी स्थानकाजवळ रुळावर माती आल्यानं कोकण रेल्वेचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. दरड कोसळल्यामुळे अडकून पडलेली कोकण रेल्वे आणखी काही तास ठप्प राहण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी-सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसला आहे. श्री गंगानगर एक्सप्रेस कामथे स्थानकात, तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरीत, सावंतवाडी दिवा दिवाणखवटी स्थानकात थांबून ठेवण्यात आली आहे. मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबवली आहे.
मत्स्यगंधा एक्सप्रेस पनवेल वरून सव्वाचार वाजता निघाली आणि रोहा येथे मागील पाच तासापासून उभी आहे. खेड जवळ रुळावर दरड कोसळल्यामुळे गाडी थांबण्यात आली.रविवारी रात्री 9 वाजता सांगण्यात आले गाडी ही पुन्हा पनवेल स्टेशनला जाणार आहे. त्यानुसार इंजिनसुद्धा लावले. पण गाडी पुन्हा मडगाव बाजूला जाईल असं सांगण्यात आलं. त्यानुसार इंजिन काढण्यात आले. आता असं कळते की या गाडीच्यासमोर नेत्रावती एक्सप्रेस आहे. ती गाडी पनवेलला परत येत आहे. रेल्वेमध्ये कोणीही व्यवस्थित माहिती देत नसल्याने प्रवासी संभ्रमित झाले आहे.
माणगावमध्ये एर्नाकुलम एक्सप्रेस उभी
माणगाव रेल्वे स्थानकात दुरंतो, निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेस गाडी चार तास उभी आहे. कोकण विभागातील दिवाणखवटी ते विन्हेरे या भागांमध्ये दरड कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प आहे. मात्र याचा फटका प्रवाशांना चांगलाच बसलेला दिसतोय. एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे दरड कोसळण्याचे प्रकार यामुळे कोकण रेल्वेला याचा चांगलाच फटका बसला आहे. या परिस्थितीमुळे प्रवाशांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. रायगड जिल्ह्यातल्या माणगाव रेल्वे स्थानकात देखील प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. गेल्या पाच तासांपासून हे प्रवासी येथे अडकून पडले आहेत. अद्याप कधी रेल्वे सेवा सुरळीत होईल हे सांगणं कठीण आहे .
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर पाण साचलं -
पुणे- मुंबई एक्सप्रेसवेवरील बोरघाटात पाणी साचल्यानं वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागतेय. मुंबईकडे जाणाऱ्या लेनमध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. छोट्या गाड्यांच्या चालकांची अधिक तारांबळ उडतेय. कारण एकीकडे पाण्यातून वाट काढण्याचं आव्हान आहे, तर ते पूर्ण केल्यावर गाडी बंद पडण्याची देखील भीती असते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE