‘फिट मुंबई’ पुढाकार अंतर्गत वांद्रे येथे ‘फिट सॅटर्डे’ मोहीम संपन्न
‘फिट मुंबई’ पुढाकार अंतर्गत वांद्रे येथे ‘फिट सॅटर्डे’ मोहीम संपन्न
महानगर
मुंबई प्रतिनिधी - सुदृढ आरोग्य आणि तंदुरुस्त जीवनशैली हीच खरी संपत्ती आहे. रोजच्या धकाधकीच्या वेळापत्रकातून मुंबईकर नागरिकांनी सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. मुंबईकरांच्या आरोग्यवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका ‘फिट सॅटर्डे’ सारखे विविध उपक्रम सातत्याने राबवत असते. नागरिकांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले.
मुंबईकर नागरिकांचे आरोग्य सुदृढ आणि दैनंदिन जीवनशैली तंदुरुस्त रहावी, या उद्देशाने ‘फिट इंडिया’च्या धर्तीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ‘फिट मुंबई’ पुढाकार अंतर्गत ‘फिट सॅटर्डे’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ गतवर्षी (दिनांक २५ ऑक्टोबर २०२५) वांद्रे किल्ला उद्यान येथे करण्यात आला होता. यापुढे प्रत्येक शनिवारी सकाळी ६.३० वाजता वांद्रे येथील किल्ला उद्यान परिसर आणि एम. आय. जी. क्लब या ठिकाणी ही मोहीम पार पडणार आहे. तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India) आणि फिट इंडिया मूव्हमेंट यांच्या सहकार्याने महानगरपालिकेच्या सर्व २६ प्रशासकीय विभागांमध्ये ही मोहीम राबविण्याचे प्रस्तावित आहे.
व्यायाम न करणाऱ्यांना नियमित व्यायाम करण्याची प्रेरणा मिळावी, न चालणाऱ्यांना चालायला लावणे, चालणाऱ्यांना जॉगिंगसाठी प्रोत्साहित करणे आणि जॉगिंग करणाऱ्यांना धावण्यासाठी प्रेरित करणे हा ‘फिट सॅटर्डे’ या मोहिमेचा उद्देश आहे. “फिट मुंबई” या अभियानाचे घोषवाक्य ‘फिटनेस दिल से’ असे असून प्रत्येक मुंबईकराच्या फिटनेस प्रवासाला नवी दिशा देत आहे. ही केवळ मोहीम नसून मुंबईकरांनी मुंबईकरांसाठी सुरू केलेली एक चळवळ आहे. ही चळवळ अधिक प्रबळ करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन या मोहिमेला पाठबळ द्यावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान आज आयोजित ‘फिट सॅटर्डे’ उपक्रमात सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. योगा, प्राणायाम, ध्यानधारणा (मेडिटेशन) यासह चालणे, धावणे, झुंबा यासारखे विविध व्यायाम प्रकार यावेळी करण्यात आले. सहभागी नागरिकांनी नियमित व्यायाम व निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला.
मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटियार, मुंबईचे अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री. कृष्ण प्रकाश, भारतीय महसूल सेवेतील अधिकारी श्री. अंबरनाथ खुळे, महानगरपालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ ३) श्री. विश्वास मोटे, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे, सहायक आयुक्त (एच पूर्व) श्रीमती मृदुला अंडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी (एच पूर्व) डॉ. (श्रीमती) प्राजक्ता आंबेरकर यांच्यासह स्थानिक नागरिक या उपक्रमात सहभागी झाले.
एम. आय. जी. क्लबचे सचिव श्री. निशांत पाटणकर, श्री. सुबोध कुलकर्णी आणि शिल्पा योगा स्कूल यांचे संयोजन सहकार्य लाभले.
मोहीमेच्या निमित्ताने उपक्रम:
१. प्रत्येक शनिवारी सकाळी ६.३० वाजता उद्याने आणि मैदानांवर फिटनेस सत्रांचे आयोजन.
२. सर्व वयोगटांसाठी चालणे, जॉगिंग आणि योग सत्रे.
३. विभागीय स्तरावर स्थानिक पातळीवर फिटनेस व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून फिटनेस सत्रांचे आयोजन.
४. शिवयोग केंद्राच्या माध्यमातून योग, ध्यानधारणा आणि प्राणायाम सत्रांसाठी समन्वय.
५. आरोग्य व मानसिक स्वास्थ्य याविषयी माहिती, शिक्षण आणि संवाद मोहिमेद्वारे जनजागृती करणे व नागरी सहभाग वाढवणे.
६. शाळकरी तसेच महाविद्यालयीन तरुणांसाठी शारीरिक व्यायाम सत्रांचे आयोजन करणे. कमी वयातच व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्पर्धांचे आयोजन करणे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर